WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला २०९ धावांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. २०२१ मध्ये न्यूझीलंड आणि २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या पराभवात रोहित शर्माच्या खराब कर्णधाराचा मोठा वाटा होता. या सामन्याच्या तयारीला सुरुवात केल्यापासून भारतीय संघ विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देऊ शकला नाही. यामुळे भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनावर सडकून टीका केली.
भारतात अडीच दिवसात मॅच जिंकून तुम्ही ट्रॉफी नाही जिंकू शकत- हरभजन सिंग
माजी अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगने लंडनमधील ओव्हल येथे झालेल्या WTC अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघातील अनेक चुकांवर बोट ठेवत टीका केली आहे. तो म्हणाला की, “संघातील नामवंत खेळाडू आहेत त्यांनी मोठ्या सामन्यात संघांची जबाबदारी उचलली पाहिजे. इतरवेळी तुम्ही किती धावा करत, विक्रम करता हे एका बाजूला पण आयसीसी, आशिया चषक यांसारख्या मोठ्या सामन्यात जर तुम्ही उच्च कोटीची कामगिरी करत नसाल तर मग तुमच्या या विक्रमांचा काहीच फायदा नाही.”
हरभजनने संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआय यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तो म्हणाला, “भारतात तुम्ही ज्या टेस्ट सामने खेळतात ते दोन दिवसात कसे काय संपतात? विक्रम रचण्यासाठी फायनलमध्ये येण्यासाठी तुम्ही तिथे अडीच दिवसात मॅच जिंकून स्वतःला फेक आत्मविश्वास देत आहात. यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधीच देत नाहीत. यामुळे अशा मोठ्या सामन्यात भारताचा पराभव होतो.
माजी ऑफस्पिनर पुढे म्हणाला की, “भारतात पहिल्या षटकापासून स्पिनर गोलंदाजी करतात त्यामुळे वेगवान गोलंदाजांना संधीच मिळत नाही. फिरकी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर सुद्धा सामना पाचव्या दिवशी जायला हवा. आमच्या काळात आम्ही कधीच दोन-अडीच दिवसात सामना जिंकलेलो नाही. यामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होत आहे.
पाँटिंग, स्मिथ, विलियम्सन यांसारख्या खेळाडूंकडून भारतीय फलंदाजांनी शिकायले हवे- गांगुली
भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर बोलताना माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, “मोठ्या सामन्यात जर तुम्ही मोठी खेळी नाही केली तर कधीच तुम्ही असे सामने जिंकू शकणार नाहीत. आयसीसी ट्रॉफीमध्ये गेल्या १० वर्षात रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा किंवा इतर खेळाडूंचे प्रदर्शन अतिशय खराब राहिले आहे. तुम्ही जर कधी पाहिलं दुसऱ्या संघांकडे तर २००३ साली रिकी पाँटिंग आता स्टीव्ह स्मिथ, मागील वर्षी केन विलियम्सन यांनी मोठी खेळी केली होती. भारताकडून २००७, २०११ किंवा २०१३ साली गौतम गंभीर, एम.एस. धोनी, १९८३ला मोहिंदर अमरनाथ यांनी चांगली कामगिरी केली म्हणूनच भारत जिंकला. हे जर भारताने वेळीच लक्ष्यात घेतले नाही तर पुढेही असेच होत राहणार.”