IPL 2019: शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. हातातून सामना निसटणार अशी परिस्थिती असतानाही मुंबईने पुनरागमन करत चेन्नईचा पराभव केला. विशेष म्हणजे, ऑरेंज आणि पर्पल कॅप विजेत्यांमध्ये मुंबईच्या एकाही खेळाडूचा समावेश नव्हता. दरम्यान मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने याने टोपी मिळाल्याची चिंता नाही, पण ट्रॉफी मिळाली याचा आनंद आहे असं सांगत खेळाडूंसोबत विजय साजरा केला.
मुंबई इंडियन्सने सामना जिंकल्यानंतर ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत महिला जयवर्धने खेळाडूंशी संवाद साधत सांगताना दिसत आहे की, ‘आज आपण पराभव स्विकारला नाही.आपण काही चुका केल्या पण आपण सतत पुनरागमन करत होतो आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. हेच कल्चर आपण निर्माण केलं पाहिजे. या संपूर्ण सीजनमध्ये प्रत्येक खेळाडूने आपलं मोलाचं योगदान दिलं आहे. आपल्याकडे ऑरेंज कॅप नाही, ना पर्पल कॅप आहे पण चिंता कशाला करायची आपल्याकडे ट्रॉफी आहे’.
| “No purple caps, no orange caps but who cares? We’ve got this ” – @MahelaJay #OneFamily #Believe #CricketMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/k4Vf1p7gfq
— Mumbai Indians (@mipaltan) May 13, 2019
मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.