भारतीय संघाला महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून हार पत्करावी लागली. अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने केलेल्या भागीदारीच्या जोरावर त्यांनी भारतावर ८ गडी राखून मात केली आणि स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आणले. आता या विश्वविजेतेपदासाठी इंग्लंडला ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे आहेत. भारताला हा सामना फलंदाजीतील हाराकिरीमुळे गमवावा लागला असा सूर सर्वत्र उमटताना दिसला. त्यातच अनुभवी मिताली राज हिला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयावरही चाहत्यांनी आणि जाणकारांनी टीका केली. पण मितालीला वगळण्याच्या निर्णयाबाबत अजिबात पश्चात्ताप होत नसल्याचे संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने सांगितले आहे.
मिताली ही अनुभवी खेळाडू आहे. पण तिला संघाबाहेर ठेवणे हा संघासाठी घेतलेला निर्णय होता. त्यामुळे तिला वगळल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही, असे मत तिने व्यक्त केले. आम्ही ज्या काही योजना बनवल्या, त्या योजना संघासाठी तयार करण्यात आल्या होत्या. कधी कधी या योजनांचा फायदा होतो, तर कधी त्या योजना फसतात. पण त्याचा पश्चात्ताप नाही. आमच्या संघातील खेळाडू ज्या पद्धतीने मैदानावर खेळल्या, ते पाहून मला त्यांच्यावर गर्व आहे, असेही ती म्हणाली.
दरम्यान, भारताने दिलेल्या ११३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. सलामीच्या फलंदाज टॅमी बेमाँड आणि डॅनिअल वेट या लवकर माघारी परतल्या. मात्र यानंतर अॅमी जोन्स आणि नताली स्किवरने तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी रचत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडकडून स्किवरने ५२ तर अॅमी जोन्सने ५३ धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव आणि दिप्ती शर्माने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
त्याआधी इंग्लिश कर्णधार हेदर नाईटने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिलांना संघ ११२ धावाच करू शकला. स्मृती मंधाना आणि तानिया भाटीया जोडीने पहिल्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली होती. पण स्मृती मंधाना माघारी परतल्यानंतर तानिया भाटीयाही बाद झाली आणि ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या साथीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा प्रभाव धावफलकावर पडू शकला नाही. भारताकडून स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, तानिया भाटीया आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या ४ फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली.