२०२० साली जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पात्र होण्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाने कंबर कसली आहे. पात्रता फेरीत सर्वोत्तम कामगिरीसाठी हॉकी इंडियाने आपल्या महिला संघातील खेळाडूंसाठी एक डाएट प्लान आखून दिला आहे. यामध्ये खेळाडूंना गोड-तिखट आणि तेलकट पदार्थ टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक पात्रता फेरी खेळणार आहे.
वेन लोम्बार्ड या प्रसिद्ध आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिला हॉकीपटू आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर काम करत आहेत. संघातली प्रत्येक खेळाडू आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत आहे. मैदानात चांगली कामगिरी करण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्ही गोड पदार्थ-चॉकलेट, तेलकट पदार्थ व्यर्ज केले आहेत. भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपालने माहिती दिली.
जपानमधील स्पर्धा जिंकल्यानंतर जेव्हा आम्ही भारतात आलो, तेव्हा मला आईच्या हातचे ‘राजमा-चावल’ खायची इच्छा झाली होती. अशावेळी लोम्बार्ड आम्हाला डाएट प्लानमधून सुट्टी घेण्याची सवलत देतात, मात्र ती सवलत एका दिवसापूरतीच असते. राणी आपल्या संघाच्या डाएट प्लानविषयी बोलत होती. भारतीय महिला हॉकी संघ १९८० साली झालेल्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला होता. ही भारतीय महिलांची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. २०१६ साली पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघ पात्र ठरला होता, मात्र यासाठी त्यांना ३६ वर्ष वाट पहावी लागली होती. त्यामुळे यंदा भारतीय महिला संघ ऑलिम्पिकला पात्र ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.