दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर सुरूवातीलाच दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागलेल्या भारतीय संघाच्या जखमांवर मीठ चोळत दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आता सचिन तेंडुलकर नसल्याने भारताविरुद्ध योजना आखणे सोपे जाईल असे म्हटले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात सचिन तेंडुलकर नसल्याने दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांनी दिलासा व्यक्त केला परंतु, यातून त्यांनी सध्याच्या भारतीय संघाविरुद्ध सोयीस्कररित्या योजना आखता येतील असे म्हणत त्यांनी जणू भारतीय संघाच्या खेळावर प्रश्नचिन्ह निर्माण केला.
डोमिंगो म्हणाले, “सचिन हा त्यांच्यासाठी मोठा खेळाडू होता व भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये त्याचा आश्वासक प्रभाव जाणवत असे. आता सचिनला बाद करायचे नाही, ही बाब आनंददायी आहे. तसेच आमच्या वेगवान गोलंदाजीवर ढेपाळणाऱया भारतीय संघाच्या फलंदाजीच्या या कमकुवत दुव्याचा फायदा आम्ही नक्की उचलू” असेही ते म्हणाले.
गेल्या महिन्यात निवृत्त झालेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१०-११ साली दक्षिण आफ्रिका दौऱयामध्ये तीन कसोटी सामन्यांत दोन शतके ठोकली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No tendulkar makes life easier for proteas sa coach domingo