आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा निर्णय; लिएण्डर पेस व महेश भूपती यांना फटका?
रिओ येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील टेनिसमध्ये यंदा विशेष प्रवेशिका देण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मनाई केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पात्रता स्पर्धेद्वारेच या स्पर्धेत स्थान मिळवावे लागणार आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाचे (आयटीएफ) सचिव जुआन मार्गेट्स यांनी दिली. या निर्णयाचा फटका भारताचे अनुभवी खेळाडू लिएण्डर पेस व महेश भूपती यांना बसण्याची शक्यता आहे. पेस हा पहिल्या पन्नास क्रमांकांच्या जवळपास आहे. तर भूपती हा पहिल्या दोनशे क्रमांकांमध्येही नाही.
‘‘विशेष प्रवेशिकेबाबत माझ्याकडे अनेकांचे अर्ज आले आहेत. तसेच अनेक खेळाडू चौकशीही करीत आहेत. अगोदरच्या ऑलिम्पिकचे वेळी आयटीएफला विशेष प्रवेशिकांबाबत अधिकार मिळाले होते. यंदा मात्र केवळ पात्रता फेरीद्वारेच खेळाडूंना ऑलिम्पिकचे तिकीट मिळणार आहे. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसारच या स्पर्धेत स्थान मिळविता येईल,’’ असे मार्गेट्स यांनी सांगितले.
जागतिक क्रमवारीत रोहन बोपण्णा हा ११व्या क्रमांकावर असून, पेस ५२व्या क्रमांकावर आहे. सलग सातव्यांदा ऑलिम्पिकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पेस उत्सुक आहे. मात्र पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्याला झगडावे लागणार आहे. साकेत मायनेनी (११३), पुरव राजा (११५), जीवन नेंदचेझियन (१४०) हे पेसखालोखाल जागतिक क्रमवारीत आहेत. भूपतीला २१४वे स्थान आहे. ६ जून रोजी जाहीर होणाऱ्या क्रमवारीनुसार खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पुरुष व महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी ६४ खेळाडूंची कार्यक्रमपत्रिका (ड्रॉ) असते. दुहेरीत २४ जोडय़ांना थेट प्रवेशिका मिळते, तर आठ जोडय़ांना पात्रता फेरीद्वारे प्रवेश दिला जातो. दुहेरीतील पहिल्या दहा क्रमांकांपर्यंतच्या खेळाडूंना थेट प्रवेशिका मिळते व आपला सहकारी निवडण्याचा अधिकार असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा