आगामी जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय महिला संघातील युवा बॉक्सर्सची गर्भचाचणी घेणार असल्याचे आरोप बॉक्सिंग इंडियाने खोडून काढले आहेत. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या नियमांनुसार (एआयबीए) फक्त भारतीय महिला संघातील वरिष्ठ खेळाडूंना अशा चाचणीला सामोरे जावे लागणार आहे, असे स्पष्टीकरण बॉक्सिंग इंडियाने दिले.
चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व सहभागी महिला खेळाडूंनी डॉक्टरकडून गर्भधारणा नसल्याचे प्रमाणपत्र आणणे गरजेचे आहे, असे एआयबीएच्या निमंत्रण पत्रिकेत स्पष्टपणे म्हटले आहे. या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सर्व प्रशिक्षकांनी बॉक्सिंग इंडियाला लेखी कळवले आहे. ही चाचणी भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साइ) की साइच्या डॉक्टरांकडून केली जाईल, याबाबतही अद्याप साशंकता आहे.
‘‘कनिष्ठ बॉक्सर्सची गर्भचाचणी केली जाईल, हे प्रसारमाध्यमांचे आरोप खोडसाळपणाचे आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे वय हे १९ वर्षे आहे. भारतीय संघाच्या सराव शिबिरात एकही युवा खेळाडूचा सहभाग नाही. त्यामुळे युवा खेळाडूंची गर्भचाचणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एआयबीएच्या नियमांचे आम्ही पालन करत आहोत. भारतीय बॉक्सर्सच्या सुरक्षेची जबाबदारी बॉक्सिंग इंडियाची आहे,’’ असे बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जजोडिया यांनी सांगितले.

Story img Loader