गेल्या काही दिवसांमध्ये यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीचा ढासळलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला होता. अनेक माजी खेळाडूंनी धोनीला निवृत्त होण्याचाही सल्ला दिला होता. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने आगामी 2019 विश्वचषकासाठी धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. आतापर्यंत भारतीय संघासाठी धोनीने मोठं योगदान दिलं आहे, त्यामुळे कोणालाही धोनीला निवृत्त हो सांगण्याचा अधिकार नाहीये. आफ्रिदी Times Now वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
“धोनीने आतापर्यंत भारतीय संघासाठी जे काही केलंय, ते क्वचितच कोणी केलं असेल. त्यामुळे कोणालाही धोनीला निवृत्त हो हे सांगण्याचा अधिकार नाहीये. 2019 विश्वचषकासाठी धोनीला भारतीय संघात जागा मिळायलाच हवी.” धोनीला नुकत्याच झालेल्या विंडीज आणि ऑस्ट्रेलिया टी-20 दौऱ्यात बीसीसीआयने विश्रांती दिली आहे.
धोनी हा भारतीय संघाचा महत्वाचा हिस्सा आहे. आतापर्यंत त्याचं भारतीय संघातलं योगदान पाहता, त्याने निवृत्ती स्विकारावी यासाठी कोणीही त्याच्यावर दबाव टाकू शकत नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीच्या बॅटमधून धावांचा ओघ आटत चालला आहे. अनेक महत्वाच्या सामन्यांमध्ये धोनीला मोक्याच्या क्षणी धावा जमवण्यात अपयश आलं होतं. यामुळेच अनेक माजी खेळाडूंनी धोनीला संघात पर्याय शोधण्याची वेळ आल्याचं म्हटलं होतं.