विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या दोन टी-२० सामन्यात विजय मिळवत भारत सध्या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. ऑकलंडनंतर भारत तिसऱ्या सामन्यासाठी हॅमिल्टनला दाखल झाला आहे. ऑकलंड ते हॅमिल्टन हा प्रवास टीम इंडियाने बसमधून केला.
फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या खास शैलीत Chahal TV या शोमध्ये आपल्या सहकाऱ्यांना बोलतं केलं. यावेळी बोलत असताना चहलने टीम इंडियाच्या बसमध्ये एक जागा अजुनही धोनीसाठी राखीव असल्याचं सांगितलं. आजही धोनीसाठी असलेल्या आदरामुळे कोणताही खेळाडू तिकडे बसत नसल्याचं चहल म्हणाला. पाहा हा व्हिडीओ…
पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत न्यूझीलंडला चारीमुंड्या चीत केलं. विशेषकरुन गोलंदाज आणि फलंदाजीत लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांची कामगिरी वाखणण्याजोगी होती. आगामी सामन्यात भारतीय संघ जिंकल्यास, मालिका विजयाची सुवर्णसंधी संघाकडे असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.