टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. विश्वविजेता गुकेशपासून ते महिला बुद्धिबळपटूंपासून सर्वच जण चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक योकुबोव्ह याने सामन्यात भारतीय महिला खेळाडू वैशालीला हात मिळवण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता. यानंतर त्याने सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यानंतर त्याने सोशल मीडियावर माहिती देत माफी मागितली होती. याकुबोव्हने धार्मिक कारण देत हात न मिळवल्याचे सांगितले होत. पण आता त्याने स्वतः जाऊन माफी मागत तिची भेट घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा स्टील बुद्धिबळाच्या चौथ्या फेरीच्या सामन्यात वैशालीचा सामना नोदिरबेक याकुबोव्हशी होता. सामन्यापूर्वी खेळाडू सहसा एकमेकांना हात मिळवतात. वैशालीने हात पुढे केला पण नोदिरबेकने हाताने नकार देत तो थेट सीटवर बसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. याकुबोव्हने नंतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले आणि कारण स्पष्ट केले. तो म्हणाला की, तो मुस्लिम असल्यामुळे तो मुलींशी हस्तांदोलन करत नाही.

यानंतर आता याकुबोव्हने स्वतः जाऊन वैशालीची माफी मागण्याचे ठरवले. गुरुवारी टाटा स्टील स्पर्धेचा विश्रांतीचा दिवस होता. यादरम्यान त्याने वैशालीची भेट घेतली. वैशालीचा भाऊ प्रज्ञानंद आणि आईही तेव्हा उपस्थित होते. याकुबोव्हने वैशालीला फुलं आणि चॉकलेट दिले आणि संपूर्ण घटनेबद्दल माफी मागितली.

याकुबोव्ह वैशालीबरोबर बोलताना म्हणाला, “जे काही झालं त्यासाठी सॉरी. आपल्या दोघांसाठी तो एक विचित्र प्रसंग होता. त्या दिवशी मी घाईत होतो आणि त्यामुळे गैरसमज झाला, सॉरी. मी तुम्हाला आणि तुमच्या भावाला शुभेच्छा देतो. मी तुमचा, तुमचा भाऊ आणि सर्व भारतीय बुद्धिबळपटूंचा आदर करतो. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

वैशालीने उत्तर दिले की मी तुमची परिस्थिती समजते आणि माफी मागू नका. मला याचं वाईट वाटलं नाही. वैशालीचा भाऊ आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद यांनीही नोदिरबेक यांना याबाबत फार विचार करू नका असे सांगितले. याकुबोव्हने दोन्ही बुद्धिबळपटू भावंडांना शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेतला. याकुबोव्हचा व्हीडिओ सोशल मीडियावर चेसबेस इंडियाने शेअर केला असून त्याचं कौतुक केलं जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nodirbek yakubboev gives flowers and chocolate to vaishali tenders personal apology for not shaking her hand bdg