Pakistan vs West Indies 2nd Test Updates: पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात रावळपिंडी येथे २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. २४ जानेवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या खेळाडूने इतिहास घडवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची चांगलीच दमछाक उडाली. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान पाकिस्तानच्या ३८ वर्षीय गोलंदाजाने हॅटट्रिक घेत धुव्वा उडवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोमान अलीने आपल्या तिसऱ्या षटकात पहिल्या ३ चेंडूत सलग ३ फलंदाजांना बाद करत हॅटट्रिक घेत खळबळ उडवून दिली. अशाप्रकारे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा नोमान अली हा पहिला पाकिस्तानी फिरकी गोलंदाज ठरला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ट इंडिजने ३७ धावांत ४ विकेट गमावल्या. यानंतर १२व्या षटकात नोमान अलीकडे तिसरे षटक टाकण्यासाठी चेंडू सोपवला आणि पहिल्या ३ चेंडूत विकेट घेत शानदार हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला.

नोमानने षटकाच्या पहिल्या चेंडूवर जस्टिन ग्रीव्हजला, दुसऱ्या चेंडूवर टेविन इमलाच आणि तिसऱ्या चेंडूवर केविन सिंक्लेअरला बाद केले. ग्रीव्हज आणि सिंक्लेअर झेलबाद झाले. बाबर आझमने स्लिपमध्ये या दोन्ही खेळाडूंचा झेल टिपला. त्याचवेळी टेविन इम्लाचला नोमान अलीने पायचीत केले. ग्रीव्हजने एक धाव काढली पण उर्वरित दोन फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत. वेस्ट इंडिजने पहिल्या डावातील १८ षटकांत ८ विकेट गमावत केवळ ६४ धावा केल्या.

पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम ५ वेळा झाला आहे. परंतु नोमान अली हा हॅटट्रिक घेणारा पहिला फिरकीपटू ठरला. नोमान अली, वसीम अक्रम, मोहम्मद सामी, नसीम शाह यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. कसोटीत २ हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noman ali becomes first pakistan spinner to take test hattrick in pak vs wi 2nd test multan watch video bdg