प्रशांत केणी

प्रो कबड्डी लीगच्या लिलावातील मानधनाला न्याय देण्यात नामांकित कबड्डीपटू अपयशी

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामाचा आढावा घेतल्यास करोडपती कबड्डीपटू वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर अपयशी ठरले आहेत. मात्र पवन शेरावत, नवीन कुमार, सिद्धार्थ देसाई, नितेश कुमार यांच्यासारख्या नव्या खेळाडूंनीच आपली छाप पाडल्याचे दिसून येते. रिशांक देवाडिगा आणि फझल अत्राचाली या दोनच खेळाडूंचे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

यंदाच्या प्रो कबड्डीच्या लिलावात इतिहास घडला आणि सहा जण कोटय़धीश झाले. हरयाणा स्टीर्सने मोनू गोयतला एक कोटी ५१ लाख रुपयांच्या विक्रमी बोलीला खरेदी केले. त्यानंतर दुसरा क्रमांक तेलुगू टायटन्सच्या राहुल चौधरीने (एक कोटी २९ लाख) लावला. याशिवाय जयपूर पिंक पँथर्सचा दीपक हुडा (१.१५ कोटी), पुणेरी पलटणचा नितीन तोमर (१.१५ कोटी), यूपी योद्धाचा रिशांक (१.११ कोटी) आणि यू मुंबाचा फझल (१ कोटी) हेसुद्धा कोटय़धीश झाले. परंतु त्यांची कामगिरी त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत समाधान देणारी नसल्याची प्रतिक्रिया कबड्डीविश्वात उमटत आहे.

मोनू (१६४ गुण), राहुल (१६६ गुण), दीपक (२०८ गुण) आणि नितीन (१०२ गुण) हे खेळाडू संघासाठी तारणहार ठरू शकले नाही. साखळीमधील २२ सामन्यांमध्ये त्यांच्या खात्यावर गुण जमा झाले, परंतु ते संघाचा स्तर उंचावण्याइतपत पुरेसे नव्हते. यूपी योद्धा संघाला ‘क्वालिफायर-२’पर्यंत नेणारा कर्णधार रिशांकच्या खात्यावर १०३ गुण आहेत. मात्र त्याच्या संघातील प्रशांत कुमार राय (१४२ गुण) आणि श्रीकांत जाधव (१३९ गुण) या दोन चढाईपटूंच्या खात्यावर त्याच्यापेक्षा अधिक गुण आहेत. सहा करोडपतींपैकी फक्त फझल वैयक्तिक कामगिरीला न्याय देऊ शकला आहे. तो पकडपटूंच्या यादीत ८३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र बाद फेरीत मोक्याच्या क्षणी तो आपला खेळ उंचावू शकला नाही. परिणामी यू मुंबाचे आव्हान संपुष्टात आले.

बेंगळूरु बुल्सला अंतिम फेरीत नेणारा पवन शेरावत सर्वाधिक २४९ गुणांसह चढाईपटूंच्या यादीत आघाडीवर आहे. त्याला लिलावात फक्त ५२ लाख ८० हजार रुपयांची बोली लागली होती. या यादीत यू मुंबाचा सिद्धार्थ देसाई (२१८ गुण) तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यावर फक्त ३६ लाख ४० हजारांची बोली लागली होती. याशिवाय मणिंदर सिंग (५६ लाख ८७ हजार), नवीन कुमार (६ लाख ६० हजार), चंद्रन रंजित (६१ लाख २५ हजार), सचिन तन्वर (५६ लाख ८७ हजार) हे खेळाडू लक्ष वेधून घेत आहेत. भारताचा कर्णधार अजय ठाकूरसुद्धा ७६ लाख २३ हजारांची बोली जिंकूनही तमिळ थलायव्हा संघाला बाद फेरी गाठून देऊ शकला नाही.

अखेरच्या सामन्यात बाद फेरीमधील स्थान निश्चित करणाऱ्या यूपी योद्धाच्या यशात नितेश कुमारच्या नेत्रदीपक संरक्षणाचा सिंहाचा वाटा आहे. २४ सामन्यांत सर्वाधिक ९४ गुण मिळवून तो पकडपटूंच्या यादीत अग्रस्थानावर आहे. त्याच्यावर लिलावात फक्त सहा लाख ६० हजारांची बोली लागली होती. याशिवाय गुजरातचे परवेश भन्सवाल (८२ गुण) आणि सुनील कुमार (६९ गुण) हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. मात्र त्यांच्यावर अनुक्रमे ३५ लाख आणि ४९ लाख १० हजार अशी बोली लागली होती.

प्रो कबड्डीच्या लिलावात कबड्डीपटूंना करोडपती केले, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. मात्र संघांची कामगिरी आणि खेळाडूंना मोजलेले पैसे याचे मूल्यमापन फ्रेंचायझी नक्की करतील. त्यामुळे पुढील हंगामात त्याचे परिणाम दिसून येतील आणि एकाच खेळाडूवर मोठी रक्कम लावली जाणार नाही.

-श्रीराम भावसार, माजी कबड्डीपटू आणि प्रशिक्षक

Story img Loader