Sanjay Manjrekar comment created controversy : भारतीय संघ आणि मुंबईचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर पुन्हा एकदा थेट प्रक्षेपणादरम्यान केलेल्या टिप्पणीमुळे ट्रोल झाला आहे. महिला टी-२० विश्वचषक २०४ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एका प्रसिद्ध समालोचकाने अशी टिप्पणी केली, ज्यामुळे नवा वाद पेटला आहे. मांजरेकर म्हणाले की, उत्तरेकडील खेळाडूंकडे ते फारसे लक्ष देत नाहीत. त्यांचे हे वक्तव्य अनेकांना खटकले आहे. त्यामुळे आता मांजरेकर यांना सोशल मीडियावर ‘मुंबई लॉबी’ या टोमण्याला सामोरे जावे लागत आहे.

संजय मांजरेकर यांनी भारतीय डावाच्या ११व्या षटकात ही वादग्रस्त टिप्पणी केली. वास्तविक, मांजरेकरांचे कॉमेंट्री पार्टनर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांच्याबाबत चर्चा करत होते. त्यांनी मांजरेकरांना सांगितले की क्षेत्ररक्षण प्रशिक्षक हे पंजाबचे माजी क्रिकेटपटू आहेत. यानंतर मांजरेकर म्हणाले, “माफ करा, मी त्यांना ओळखले नाही. मी उत्तरेकडील खेळाडूंकडे फारसे लक्ष देत नाही.” भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही पंजाबची असल्यामुळे या टिप्पणीमुळे काही चाहते नाराज झाले आहेत.

संजय मांजरकेर सोशल मीडियावर ट्रोल –

एका यूजरने लिहिले की, “मुंबई लॉबी ही एक वास्तविकता आहे.” दुसरा म्हणाला, “मुंबईतील लॉबी अस्तित्वात नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे लोकांच्या कल्पनेचे चित्र आहे. पण आता तुम्हीच बघा.” तिसरा म्हणाला, “ही अत्यंत लाजिरवाणी टिप्पणी आहे. त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.” अजून एका यूजरने टिप्पणी केली, “संजय मांजरेकर समालोचन पॅनेलचा भाग का आहेत? ते योग्य अभ्यास का करू शकत नाहीत.”

हेही वाचा – IND W vs NZ W : जेमिमाने सांगितला वादग्रस्त धावबादचा संपूर्ण घटनाक्रम, का स्वीकारावा लागला पंचांचा निर्णय?

कोण आहेत मुनीश बाली?

पटियालाचे मुनीश बाली हे भारतीय क्रिकेट सर्किटमधील सर्वात अनुभवी प्रशिक्षकांपैकी एक आहेत. पंजाबच्या वयोगट-स्तरीय संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय सेटअपचा त्यांना मोठा अनुभव आहे. २००८ मध्ये अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक राहिले आहेत, ज्यात विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि मनीष पांडेसारखे खेळाडू होते.