सख्खे शेजारी देश गुण्यागोविंदाने नांदताहेत, असे चित्र फारच अभावानेच पाहायला मिळते. सीमाप्रश्न असो, युद्धानंतरची स्थिती असो वा अन्य कुठलेही मतभेद, या शेजारील राष्ट्रांमध्ये कायम कुरबुरी सुरू असतात. दक्षिण कोरियातील इन्चॉनमध्ये रंगलेल्या १७व्या आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या सख्खे शेजारी पण पक्के वैरी असलेल्या राष्ट्रांमधील मतभेद हा चर्चेचा विषय बनला आहे. या कोरियन राष्ट्रांमधील युद्ध १९५३मध्ये संपुष्टात आल्यानंतरही अद्याप दोन्ही राष्ट्रांमध्ये विस्तव जात नाही. ६० वर्षांनंतरही या दोन्ही देशांमधील संबंध विकोपाला गेले आहेत.
२०००च्या सुमारास या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी वाटाघाटी सुरू होत्या. दक्षिण कोरियानेही उत्तर कोरियाला सहकार्य करण्यास मदतीचा हात पुढे केला होता. पण २०१०मध्ये दक्षिण कोरियाची युद्धनौका उत्तर कोरियामध्ये बुडवण्यात आल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा ताणले गेले आहेत. उत्तर कोरियाच्या चमूच्या खर्चाची जबाबदारी कोणी उचलायची, यावरून आशियाई स्पर्धेच्या आधीच या दोन्ही देशांमधील वाद पुन्हा उफाळून आला. पण खेळांच्या प्रथेप्रमाणे आपण खेळाडूंची व्यवस्था करणार असल्याचे दक्षिण कोरियाने जाहीर केल्यानंतर उत्तर कोरियाने आपल्या चमूतून चीअरलीडर्सना डच्चू दिला. आशियाई स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळीही दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र स्टेडियमवर येऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. रस्त्यांवर किंवा स्टेडियमच्या आत कुणीही उत्तर कोरियाचा झेंडा घेऊन फिरू नये, असे स्पष्ट आदेश संयोजकांनी चाहत्यांना दिले आहेत. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी प्रथेप्रमाणे क्रीडानगरीत सहभागी देशांच्या झेंडय़ाचे ध्वजारोहण केले जाते. या ध्वजारोहणानंतर उत्तर कोरियाच्या झेंडय़ाविरुद्ध काही निदर्शकांनी आक्षेप घेतल्यानंतर सर्व देशांचे झेंडे खाली उतरवण्यात आले.
आशियाई स्पर्धेसाठी उत्तर कोरियाचा २७३ जणांचा चमू दक्षिण कोरियात दाखल झाला आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच उत्तर कोरियाच्या लोकांनी इतक्या मोठय़ा प्रमाणात दक्षिण कोरियन भूमीत पाऊल ठेवले आहे. उत्तर कोरियाच्या खेळाडूंनी पदक जिंकल्याची बातमी ऐकण्यास देशवासीयांचे कान आसुसलेले आहेत. उत्तर कोरियातील युवा नेते किम जाँग-अन यांनी क्रीडाक्षेत्राला प्राधान्य देत दक्षिण कोरियात पदक विजेत्या खेळाडूंना आलिशान घरे देण्याचे जाहीर केले आहे. कुस्ती या खेळात उत्तर कोरियाचे वर्चस्व असून २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकली होती. २०१०च्या गुआंगझाऊ आशियाई स्पर्धेत उत्तर कोरियाने नेमबाजीतील तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा सुवर्णपदके मिळवली होती. उत्तर कोरियाचा महिलांचा संघ इन्चॉनमध्ये सुवर्णपदकासाठी दावेदार समजला जात आहे. त्यामुळे या वेळीही उत्तर कोरियाने अव्वल १० देशांमध्ये स्थान पटकावण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. विभाजनाआधी अखंडित कोरिया पाहणारे मोजकेच लोक सध्या शिल्लक आहेत. दक्षिण कोरियातील युवा पिढी उत्तर कोरियन लोकांकडे सकारात्मकतेने पाहत नाही. पण आशियाई स्पर्धेच्या निमित्ताने उत्तर कोरियाच्या फुटबॉल सामन्याला दक्षिण कोरियाच्या चाहत्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे खेळाच्या माध्यमातून का होईना, पण सख्खे शेजारी आणि पक्के वैरी या देशांमधील लोकांची मने एकत्र आली तरी तो सुवर्णयोग ठरणार आहे.
सख्खे शेजारी, पक्के वैरी!
सख्खे शेजारी देश गुण्यागोविंदाने नांदताहेत, असे चित्र फारच अभावानेच पाहायला मिळते. सीमाप्रश्न असो, युद्धानंतरची स्थिती असो वा अन्य कुठलेही मतभेद, या शेजारील राष्ट्रांमध्ये कायम कुरबुरी सुरू असतात.
First published on: 22-09-2014 at 12:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North korea south korea nabors but enemies