Hikaru Nakamura Defeats R Praggnanandhaa : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर आर वैशाली आणि तिचा भाऊ प्रज्ञानंद यांच्यासाठी संमिश्र दिवस राहिला. महिला गटात वैशालीने स्वीडनच्या पिया क्रॅमलिंगचा पराभव केला, तर पुरुष गटात प्रग्नानंदला चौथ्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर प्रज्ञानंद ५.५ गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. विशेष म्हणजे पुरुष गटात या दिवशी सर्व सामन्यांचे निकाल लागले, परंतु प्रग्नानंदला प्रभाव पाडता आला नाही आणि तो पराभूत झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८ वर्षीय प्रज्ञानंदने पाचवेळा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करून क्लासिकल गेममधील आपल्या नवोदित कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा निकाल मिळविल्यानंतर दुसऱ्या दिवशी, भारतीय प्रज्ञानंदला जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या हिकारू नाकामुराकडून पराभवाचा सामना करावा लागला. नाकामुराने खेळाच्या सुरुवातीलाच आघाडी घेतली, तर प्रज्ञानंदने अपरिहार्य वाटणाऱ्या गोष्टी टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी, त्याचा बचाव अयशस्वी झाला आणि त्याने ८६ चालीनंतर हार पत्करली, जेव्हा त्याला समजले की तो चेकमेट झाला, तेव्हा त्याने डोक्याला हात लावला.

कार्लसनही जिंकला, नाकामुरा अव्वल स्थानावर कायम –

पुरुष गटात जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडू मॅग्नस कार्लसनने आपला कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव केला. त्याचवेळी फ्रान्सच्या फिरोझा अलीरेझाने विद्यमान विश्वविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. या स्पर्धेतील चौथ्या फेरीनंतर नाकामुरा सात गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. तो अलिरेझापेक्षा अर्धा गुण पुढे आहे. कार्लसनचे सहा गुण आहेत आणि तो तिसऱ्या स्थानावर आहे, तर कारुआना पाच गुणांसह पाचव्या आणि लिरेन केवळ २.५ गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

हेही वाचा – T20 WC 2024 : “तुमच्याकडे किती सुपरस्टार आहेत हे महत्त्वाचे नाही…”, वर्ल्डकपपूर्वी ब्रायन लाराचा टीम इंडियाला इशारा

वैशालीने दुसरा विजय नोंदविला –

क्लासिकल गेम प्रकारात वैशालीचा हा दुसरा विजय असून तिने ७.५ गुणांची भक्कम आघाडी मिळवली आहे. या भारतीय खेळाडूने एकूण ८.५ गुण मिळवले आहेत. तिच्यानंतर महिला विश्वविजेती चीनची वेनजुन झू आणि युक्रेनची ॲना मुझीचुक संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. मुझीचुकने भारताच्या कोनेरू हम्पीचा पराभव करून स्पर्धेतील तिच्या पहिल्या विजयाची नोंद केली, तर वेनजुनने आर्मागेडनमध्ये तिचा देशबांधव टिंगजी लेईचा पराभव केला. सहा खेळाडूंमध्ये दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत अद्याप सहा फेऱ्यांचे सामने खेळायचे आहेत. लेई पाच गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हम्पी आणि क्रॅमलिंगचे प्रत्येकी तीन गुण आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Norway chess 2024 vaishali outwits cramling r praggnanandhaa loses to nakamura vbm