एपी, मेलबर्न
जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या इगा श्वीऑटेकला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ५०व्या स्थानी असलेल्या लिंडा नोस्कोवाकडून पराभूत व्हावे लागले. महिला गटातील अन्य सामन्यांत व्हिक्टोरिया अझरेन्का, चीनची किनवेन झेंग व युक्रेनच्या एलिना स्वितोलिना यांनी विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पुरुष गटात स्पेनचा दुसरा मानांकित कार्लोस अल्कराझ, तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव व पोलंडचा हबर्ट हुरकाझ यांनी पुढच्या फेरीतील आपले स्थान निश्चित केले.
जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेली श्वीऑटेक हा सामना जिंकून आगेकूच करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र, चेक प्रजासत्ताकच्या नोस्कोवाने श्वीऑटेकला ३-६, ६-३, ६-४ असे नमवत स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवला. चार ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी श्वीऑटेक ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीच्या पुढे जाऊ शकलेली नाही. १९ वर्षीय नोस्कोवा प्रथमच या स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळत आहे. श्वीऑटेकने पहिल्या फेरीत २०२०ची ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील विजेता सोफिया केनिन व २०२२च्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी डॅनियल कोलिन्स यांना नमवले होते. श्वीऑटेकने पहिला सेट जिंकत चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर तिला आपली लय कायम राखता आली नाही. दुसऱ्या सेटमध्ये नोस्कोवाने सातव्या गेममध्ये ‘ब्रेक पॉइंट’ वाचवताना पुढील १२ पैकी ११ गुण मिळवले व सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्येही आपली हीच लय कायम राखत तिने विजय नोंदवला.
हेही वाचा >>> IND vs BAN : भारताच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशची अवस्था बिकट, अवघ्या ५० धावांत गमावल्या चार विकेट्स
महिला एकेरीच्या अन्य सामन्यांत, अझारेन्काने एलेना ओस्टापेन्कोला ६-१, ७-५ अशा फरकाने पराभूत केले. सामन्यातील पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अझरेन्कासमोर ओस्टापेन्कोने आव्हान दिले. मात्र, अझारेन्काने विजय नोंदवत आगेकूच केली. चीनच्या झेंगने आपलीच सहकारी वँग याफानला ६-४, २-६, ७-६ (१०-८) अशा फरकाने नमवले. तर, स्वितोलिनाने स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिजा गोलुबिचला ६-२, ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
पुरुष विभागात अल्कराझने चीनच्या शँग जुनचेंगविरुद्धच्या सामन्यात ६-१, ६-१, १-० असा आघाडीवर होता. यानंतर, जुनचेंगने माघार घेतल्याने अल्कराझला पुढे चाल मिळाली. मेदवेदेवने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अॅलिसिमेला ६-३, ६-४, ६-३ अशा फरकाने पराभूत करीत आगेकूच केली. हुरकाझने फ्रान्सच्या हुगो हम्बर्टवर ३-६, ६-१, ७-६ (७-४), ६-३ असा विजय मिळवला.
बालाजी-कॉर्निया जोडी पराभूत भारताच्या एन श्रीराम बालाजी व रोमानियाच्या व्हिक्टर व्लाड कॉर्निया जोडीला पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत अल साल्वाडोरच्या मार्सेला अरेवालो व क्रोएशियाच्या मॅट पॅव्हिच जोडीकडून ३-६, ३-६ अशा पराभवाचा सामना करावा लागला. बालाजीने दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेची दुसरी फेरी गाठली होती. तसेच, युकी भांब्री व नेदरलँड्सचा रॉबिन हास तर, भारताचा विजय सुंदर प्रशांत व अनिरुद्ध चंद्रशेखर यांच्या जोडयाही स्पर्धेबाहेर गेल्या आहेत. रोहन बोपण्णा व त्याची साथीदार टिमिया बाबोसा यांनी मिश्र दुहेरीतून माघार घेतली.