जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स मैदानावर सुरू असेल्या या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने ४० षटकांत २ बाद ११८ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात शार्दूल ठाकूरने एडिन मार्करमला (३१), तर रविचंद्रन अश्विनने कीगन पीटरसनला (२८) पायचीत पकडले. कर्णधार डीन एल्गर (खेळत आहे ४६) मात्र एक बाजूने तग धरून असून त्याच्या साथीला रॅसी व्हॅन दर दुसेन ११ धावांवर खेळत आहे. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट झाले असून आफ्रिका उर्वरित १२२ धावा करणार की भारताचे गोलंदाज शिल्लक आठ बळी गारद करून ऐतिहासिक मालिका विजयावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान, या सामन्यात खराब शॉट सिलेक्शनमुळे ऋषभ पंत आऊट झाला. टीमला गरज असताना केवळ चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे ऋषभ आऊट झाल्यानंतर माजी खेळाडू गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ऋषभने केलेली चूक म्हणजे मुर्खपणा असल्याचं म्हटलंय. झालं असं की, दुसऱ्या डावात भारताने १६३ धावांवर ४ गडी गमावले होते. पुजारा आणि रहाणे दोघंही आऊट झाले होते. तेव्हा भारताला डाव सावरण्यासाठी चांगल्या खेळाची गरज होती आणि त्यामुळे पंतकडून चांगल्या धावांची अपेक्षा होती. त्यातच पंतने रबाडाच्या बॉलवर पुढे येत शॉट मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा अंदाज चुकला आणि बॉल बॅटच्या काठावर लागत थेट विकेटकीपरच्या हातात पोहोचला. अशाप्रकारे चुकीच्या शॉटमुळे आऊट झालेल्या पंतवर गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केली.
पंतच्या शॉटमुळे नाराज असलेला गंभीर म्हणाला की, “तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर दोन्ही टीमकडे सारखी संधी होती. पुजारा आणि रहाणेच्या शतकीय भागेदारीने भारताला चांगल्या स्थितीत आणलं. अशावेळी ऋषभ पंतने २०-२५ धावा काढल्या असत्या तरी भारताची स्थिती अजून चांगली झाली असती. पण पंतने बेजबाबदारपणे खेळत दक्षिण आफ्रिकेला परतण्याची संधी दिली. त्याने जो शॉट खेळला तो बहादुरी नाही तर मुर्खपणा होता. असे शॉट्स कसोटी सामन्यांमध्ये स्वीकारार्ह नाहीत,” असं म्हणत त्याने पंतला सुनावलं.