Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान लंडनमध्ये हा सामना खेळला जात आहे. या मालिकेतील चौथा सामना जिंकून इंग्लंडने मालिका आधीच ३-१ने खिशात घातली आहे. पण दीर्घ अशा इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असल्याने दौऱ्याचा शेवट गोड करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मात्र या बदलांबाबत माजी कर्णधार सुनील गावस्कर हे नाखूष असल्याचे दिसत आहेत.
आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी संघात हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि अश्विनला वगळण्यात आले आहे. पण करुण नायरसारख्या प्रतिभावान खेळाडूला संघात स्थान देण्याबाबत माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामना सुरु होण्याआधी एका कार्यक्रमात त्यांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे मत मांडले आहे.
पाचव्या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण झाले आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे. पण करुण नायर हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याने कसोटीत त्रिशतक झळकावले आहे. त्यामुळे त्याला अंतिम संघात स्थान मिळणे अधिक महत्वाचे होते. त्याला टीम इंडियातून वगळणे हे मूर्खपणाचे आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, इंग्लंडच्या संघात पाचव्या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही.