एम.एस.के प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या निवड समितीने दोन दिवसांपूर्वी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात सलामीवीर मुरली विजयने पुनरागमन केलं असून, वन-डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रोहित शर्मालाही संघात स्थान देण्यात आलेलं आहे. यांच्यासोबतच अतिरीक्त यष्टीरक्षक म्हणून पार्थिव पटेललाही संघात जागा देण्यात आली आहे. मात्र प्रसाद यांच्या निवड समिती कर्नाटकचा युवा खेळाडू मयांक अग्रवालला संघात स्थान दिलेलं नाहीये. संघात जागा न मिळणं हा मयांक अग्रवालवर अन्याय असल्याचं मत भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने व्यक्त केलं आहे.
विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी मयांकची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र संघ व्यवस्थापनाने युवा खेळाडू पृथ्वी शॉवर विश्वास दाखवला. मात्र या मालिकेत मयांकला एकही डाव खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर थेट 2019 मध्ये न्यूझीलंड अ संघाविरोधात होणाऱ्या 4 दिवसीय सराव सामन्यासाठी मयांकची संघात निवड झालेली आहे. “एकही सामना न खेळता मयांक अग्रवालला आगामी दौऱ्यासाठी कसोटी संघात स्थान मिळणार नसेल तर तो त्याच्यावर अन्याय आहे. एक खेळाडू म्हणून अंतिम 11 जणांच्या संघात स्थान मिळणं गरजेचं असतं. संधी मिळूनही तुम्ही चांगली कामगिरी केलीत नाही, तर मग बोलायला वाव नाही. मात्र एकही सामना न खेळता तुम्ही संघातून डावलले जात असाल तर एक खेळाडू म्हणून ही गोष्ट खूप वेदनादायी असते.” Cricbuzz या संकेतस्थळाशी जहीर बोलत होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आपली संघात निवड झाली नाही ही गोष्ट त्याला सतावत असेल. मी नेमका कुठे चुकलो, मी ड्रिंक्समॅन म्हणून नीट वागलो नाही का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत असतील. मयांकला संघात जागा न मिळाल्याबद्दल जहीर खाननेही नाराजी व्यक्त केली. 6 डिसेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडीलेड ओव्हलच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
अवश्य वाचा – विराटची शतकांची हॅटट्रीक, शोएब अख्तर म्हणतो माझं आव्हान पूर्ण कर !