वर्ल्डकपमधील भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चर्चेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. पहिली म्हणजे २००७ मध्ये बांगलादेशनं साखळी सामन्यात भारताचा पराभव करून भारताचं वर्ल्डकपमधलं आव्हान संपुष्टात आणलं होतं. त्याचं उट्टं आता भारतानं काढल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत. दुसरं म्हणजे या सामन्यातील विजयामुळे भारताची विजयी घोडदौड कायम राहिली आहे. तिसरं म्हणजे विराट कोहलीनं कारकिर्दीतलं ४८वं एकदिवसीय व वर्ल्डकपमधलं धावांचा पाठलाग करतानाचं पहिलं शतक साजरं केलं. पण या सगळ्याहून जास्त चर्चा आहे ती म्हणजे अम्पायर रिचर्ड केटलबॉरो यांनी विराट कोहलीला न दिलेल्या वाईड बॉलची! हा निर्णय योग्य होता की अयोग्य? असा वाद सोशल मीडियावर रंगू लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशनं या सामन्यात पहिली फलंदाजी करताना भारतासमोर विजयासाठी २५७ धावांचं आव्हान ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित-शुबमन गिल जोडीनं भारताला दणदणीत सलामी मिळवून दिली. या पायाच्या जोरावर पुढे विराट कोहली व के. एल. राहुल यांनी विजयाचा कळस चढवला. त्यामुळे भारतानं बांगलादेशवर तब्बल सात विकेट्स राखून अगदी लीलया विजय मिळवला! यादरम्यान विराट कोहलीनं त्याचं शतकही साजरं केलं.

Ind vs Ban: ‘जर सचिनच्या काळात हे अम्पायर असते…’; विराटसमोर वाईड बॉल न देणाऱ्या पंचांवर तुफान मीम्स व्हायरल…

नेमकं काय झालं त्या षटकात?

विराट कोहली वैयक्तिक ७३ धावांवर असताना भारताला विजयासाठी २८ धावा आवश्यक होत्या. तेव्हापासूनच के. एल. राहुलनं विराट कोहलीलाच अधिकाधिक खेळण्याची संधी मिळेल याची काळजी घेतली. ४२व्या षटकात विजयासाठी २ धावा शिल्लक असताना विराट कोहलीला शतकासाठी तीन धावा आवश्यक होत्या. तेव्हा बांगलादेशचा फिरकीपटू नसूम अहमदनं विराटला वाईड बॉल टाकला. त्यामुळे एक रन कमी होतोय की काय? अशी भीती विराटसह सर्व क्रिकेट चाहत्यांना वाटू लागली. त्याच भावनेनं विराटनं अम्पायर रिचर्ड केटलबॉरो यांच्याकडे पाहिलं. पण त्यांनी वाईड बॉल दिलाच नाही आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला!

विराटच्या मागून जवळपास अर्ध्या फुटावरून चेंडू विकेट कीपरच्या हातात विसावला असूनही अम्पायरनं तो वाईड बॉल दिला नसल्यानं त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. अशा प्रकारे वाईड बॉल असूनही अम्पायरला तो वाईड न देण्याचा निर्णय घेता येतो का? असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) तुफान चर्चा चालू असताना एका युजरनं चॅटजीपीटीनं यावर दिलेलं उत्तर पोस्ट केलं आहे.

चॅटजीपीटीच्या मते काय सांगतो नियम?

या पोस्टमधील फोटोवर चॅटजीपीटीवरचा संवाद दिसत आहे. “मुद्दाम टाकलेला वाईड बॉल वाईड दिला जायला हवा का?” असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून त्यावर “नाही” असं उत्तर तिथे आल्याचं दिसत आहे.

“क्रिकेटमध्ये मुद्दाम टाकलेला वाईड बॉल वाईड दिला जाऊ शकत नाही. जर अम्पायरला असं वाटलं की बॅटरला फटका मारता येऊ नये, यासाठी वाईड बॉल मुद्दाम टाकण्यात आला आहे, तर तो अयोग्य प्रकार ठरतो आणि त्यासाठी अम्पायर बॉलिंग टीमला दंड करू शकतात. मग तो दंड धावांच्या स्वरूपात असू शकतो किंवा बॉलरची ओव्हर तिथेच थांबवण्याच्या स्वरूपात असू शकतो. मुद्दाम वाईड बॉल टाकणं हे क्रिकेटमधील न्याय्य खेळाच्या नियमांच्या विरोधात आहे”, असं उत्तर चॅटजीपीटीनं दिल्याचं या फोटोत दिसत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not giving wide ball to virat right or wrong in cricket rules ind vs ban worldcup 2023 pmw