भारताच्या वन-डे आणि टी-२० संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा सध्या संघातला महत्वाच्या चर्चेचा मुद्दा ठरतो आहे. २०१९ विश्वचषकानंतर निवड समितीने पंतला धोनीच्या जागी भारतीय संघात संधी दिली. मात्र यानंतर विंडीज, आफ्रिका आणि बांगलादेश अशा तिन्ही मालिकांमध्ये पंतला अपयशाचा सामना करावा लागला. त्याच्या या अपयशी कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये धोनीला पुन्हा स्थान देण्याची मागणी सुरु झाली होती. चहुबाजूंनी टीकेचा भडीमार होत असताना, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पंतला मोलाचा सल्ला दिला आहे.

“ऋषभ अजुनही लहान आहे, एका दिवसात त्याने सर्व काही शिकावं अशी कोणाचीच अपेक्षा नाही. तुमच्याकडून चुका होणं हे साहजिकच आहे, मात्र आपल्या चुका कश्या सुधारता येतील याचाही विचार करणं गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ अशाच प्रकारे शिकता येतो. तू एका दिवसात सुपरस्टार होणार नाहीयेस, आयुष्यात चढ-उतार येत राहतील. पण जेवढी जास्त मेहनत आपण करु तेवढीच आपल्या खेळात सुधारणा होणार आहे.” ऋषभ पंतच्या फॉर्मबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री IANS वृत्तसंस्थेशी बोलत होते.

ऋषभची यष्टींमागची खराब कामगिरी पाहता, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला कसोटी क्रिकेटमध्ये विश्रांती देऊन अनुभवी वृद्धीमान साहाकडे आपला मोर्चा वळवला. दरम्यान बांगलादेश दौऱ्यानंतर आगामी विंडीज दौऱ्यासाठीही पंतची भारतीय संघात निवड झालेली आहे. ६ डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे ऋषभच्या खेळाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL पर्यंत वाट बघा, धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचं सूचक विधान

Story img Loader