* भारताचा कसोटी क्रिकेटमधील ४-० असा ऐतिहासिक विजय
* ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील काळा दिवस
* चौथ्या कसोटीत सहा विकेट राखून विजय
* रवींद्र जडेजा सामनावीर, आर. अश्विन मालिकावीर
समस्त भारतीयांच्या जल्लोषभऱ्या लखलख चंदेरी तेजाने राजधानीतील फिरोझशाह कोटला स्टेडियम उजळून निघाले होते. २०११मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर आणखी एक ऐतिहासिक क्षण भारतीयांच्या वाटय़ाला आला होता. महेंद्रसिंग धोनीच्या सिद्धहस्ते गावस्कर-बोर्डर चषक उंचावला, तेव्हा या आनंदाला पारावार नव्हता. कोटलावरील चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी धोनीने विजयी चौकार खेचून ‘हम हम है, अभी ना कोई गम है’ हे जगाला दाखवून दिले. फलंदाजांची अग्निपरीक्षा आणि फिरकी गोलंदाजांसाठी नंदनवन ठरणाऱ्या कोटलावर अपेक्षेप्रमाणे तिसऱ्याच दिवशी निकाल भारताच्या खात्यावर जमा झाला. १५५ धावांचे आव्हान सहा विकेट राखून पेलत भारताने चौथ्या कसोटीवर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रथमच भारताने ४-० अशी ‘न भूतो न भविष्यती’ विजय प्राप्त करण्याची किमया साधली. भारताने ८१ वर्षांच्या कसोटी इतिहासात हा सर्वात ऐतिहासिक विजय नोंदवला.
वर्षभरापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारतीय संघाने ०-४ अशा फरकाने दारुण पराभव पत्करला होता. सूडाने पेटलेल्या धोनीसेनेने त्या पराभवाची परतफेड केली. जागतिक क्रिकेटवर अनेक वष्रे अधिराज्य गाजविणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात ४३ वर्षांनी हा काळा दिवस वाटय़ाला आला. त्या वेळी बिल लॉरीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर ०-४ अशा फरकाने ‘व्हाइट वॉश’ पत्करला होता.
खेळपट्टीवर चेंडू अनपेक्षितरीत्या वळत असताना भारतीय फलंदाजांचीसुद्धा केविलवाणी अवस्था होत होती, परंतु दुखापतीवर मात करीत चेतेश्वर पुजाराने एका बाजूने किल्ला लढवला. त्याने आपल्या लाजवाब तंत्राच्या बळावर ९२ चेंडूंत ११ चौकारांसह ८२ धावा काढत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मुरली विजय (११), विराट कोहली (४१), सचिन तेंडुलकर (१) आणि अजिंक्य रहाणे (१) बाद झाल्यावर पुजाराने धोनीच्या (नाबाद ८) साथीने विजयाचे लक्ष्य पादाक्रांत केले. पुजाराने ग्लेन मॅक्सवेलला तीन चौकारांची आतषबाजी करीत विजयाच्या लक्ष्याची बरोबरी केली, तर धोनीने २५ हजार क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मिडविकेटला विजयी चौकार ठोकत भारतीयांना विजयाची भेट दिली. मैदानावर, ड्रेसिंगरूमध्ये याचप्रमाणे स्टेडियममध्ये एक अनोखा जल्लोष पाहायला मिळाला.
नवी दिल्लीतील पहिला कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीवरील तडा पाहून अनेक माजी क्रिकेटपटूंनी तीन दिवसांत निकाल लागेल, असे भाकीत केले होते. तिसऱ्या दिवसावर पूर्णत: गोलंदाजांचेच राज्य होते. एकंदर १६ फलंदाज दिवसभरात बाद झाले. सामन्यात ७ बळी घेणाऱ्या रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने, तर मालिकेत २९ बळी घेणाऱ्या आर. अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
त्याआधी, रवींद्र जडेजाच्या (५/५८) फिरकीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांची तारांबळ उडाली आणि फक्त १६४ धावांत त्यांचा दुसरा डाव आटोपला. पीटर सिडलने दुसऱ्या डावातही हिमतीने किल्ला लढवत ४५ चेंडूंत ७ चौकारांनिशी ५० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची आघाडीची फळी पुन्हा अपयशी ठरली.
सकाळच्या सत्रात फक्त ८ मिनिटे आणि १३ चेंडूंत भारताच्या पहिल्या डावाला पूर्णविराम मिळाला. नॅथन लिऑनने उर्वरित दोन्ही फलंदाजांना बाद करीत ९४ धावांत ७ बळी ही आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २६२
भारत (पहिला डाव) : मुरली विजय झे. वेड गो. सिडल ५७, चेतेश्वर पुजारा त्रि. गो. लिऑन ५२, विराट कोहली पायचीत गो. लिऑन १, सचिन तेंडुलकर पायचीत गो. लिऑन ३२, अजिंक्य रहाणे झे. स्मिथ गो. लिऑन ७, महेंद्रसिंग धोनी झे. वॉटसन गो. पॅटिन्सन २४, रवींद्र जडेजा पायचीत गो. मॅक्सवेल ४३, आर. अश्विन पायचीत गो. लिऑन १२, भुवनेश्वर कुमार नाबाद १४, इशांत शर्मा त्रिफळा गो. लिऑन ०, प्रग्यान ओझा पायचीत गो. लिऑन ०, अवांतर (बाइज १२, लेग बाइज १८) ३०, एकूण ७०.२ षटकांत सर्व बाद २७२.
बाद क्रम : १-१०८, २-११४, ३-१४८, ४-१६५, ५-१८०, ६-२१०, ७-२५४, ८-२६६, ९-२७२, १०-२७२.
गोलंदाजी : मिचेल जॉन्सन १७-३-४४-०, जेम्स पॅटिन्सन १४-१-५४-१, पिटर सिडल १२-३-३८-१, नॅथन लिऑन २३.२-४-९४-७, ग्लेन मॅक्सवेल ४-०-१२-१.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. जडेजा ८, ग्लेन मॅक्सवेल त्रिफळा गो. जडेजा ८, एड कोवन पायचीत गो. जडेजा २४, फिल ह्युजेस पायचीत गो. अश्विन ६, शेन वॉटसन त्रिफळा गो. ओझा ५, स्टीव्हन स्मिथ त्रिफळा गो. जडेजा १८, मॅथ्यू वेड झे. धोनी गो. ओझा १९, मिचेल जॉन्सन त्रिफळा गो. जडेजा ०, पिटर सिडल यष्टिचीत धोनी गो. अश्विन ५०, जेम्स पॅटिन्सन त्रिफळा गो. शर्मा ११, नॅथन लिऑन नाबाद ५, अवांतर (बाइज ८, लेगबाइज २) १०, एकूण ४६.३ षटकांत सर्व बाद १६४.
बाद क्रम : १-१५, २-२०, ३-४१, ४-५१, ५-५३, ६-९४, ७-९४, ८-१२२, ९-१५७, १०-१६४
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार २-०-९-०, आर. अश्विन १५.३-२-५५-२, रवींद्र जडेजा १६-२-५८-५, प्रग्यान ओझा ११-२-१९-२, इशांत शर्मा २-०-१३-१.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय त्रिफळा गो. मॅक्सवेल ११, चेतेश्वर पुजारा नाबाद ८२, विराट कोहली पायचीत गो. लिऑन ४१, सचिन तेंडुलकर पायचीत गो. लिऑन १, अजिंक्य रहाणे झे. लिऑन गो. मॅक्सवेल १, महेंद्रसिंग धोनी नाबाद १२, अवांतर (बाइज ९, लेगबाइज १) १०, एकूण ३१.२ षटकांत ४ बाद १५८.
बाद क्रम : १-१९, २-१२३, ३-१२७, ४-१२८.
गोलंदाजी : नॅथन लिऑन १५.२-०-७१-२, ग्लेन मॅक्सवेल ११-०-५४-२, मिचेल जॉन्सन २-०-१६-०, जेम्स पॅटिन्सन ३-०-७-०.
तिसऱ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : २६२
भारत (पहिला डाव) : २७२
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १६४
भारत (दुसरा डाव) : ४ बाद १५८
सत्र षटके धावा/बळी
पहिले सत्र ३३.१ ९५/७
दुसरे सत्र २७.३ १४७/६
तिसरे सत्र १९.२ ८६/३
न भूतो न भविष्यती!
* भारताचा कसोटी क्रिकेटमधील ४-० असा ऐतिहासिक विजय * ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमधील काळा दिवस * चौथ्या कसोटीत सहा विकेट राखून विजय * रवींद्र जडेजा सामनावीर, आर. अश्विन मालिकावीर समस्त भारतीयांच्या जल्लोषभऱ्या लखलख चंदेरी तेजाने राजधानीतील फिरोझशाह कोटला स्टेडियम उजळून निघाले होते.
आणखी वाचा
First published on: 25-03-2013 at 02:26 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not in past not in future