बीसीसीआयने निर्मिलेल्या वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यामुळे मायदेशात दोनशेवी कसोटी खेळण्याचा बहुमान सचिन तेंडुलकरला मिळणार आहे. मायदेशात या अनोख्या विक्रमासह क्रिकेटचे दैवत असणारा सचिन अलविदा करणार अशा चर्चाना उधाण आले होते. मात्र निवृत्तीची घाई कुणाला? असा प्रतिसवाल करत सचिनने टीकाकारांना निरुत्तर केले आहे.
घाईघाईने निवृत्ती जाहीर करण्याचा माझा विचार नाही. आताच्या घडीला आता हा निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. निवृत्तीची घाई कुणाला? असा सवाल सचिनने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. माझ्या कारकीर्दीत मी एक सूत्र जपले- एकदम मोठी उडी घेऊ नका. याच सूत्रानुसार मी वाटचाल केली आहे.
कारकीर्दीत शतकांचे शतक साकारण्याचा अद्भुत विक्रम नावावर करणाऱ्या सचिन कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारांत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. दैदिप्यमान कारकीदीचा शेवट सचिन २००वी कसोटी खेळून करेल अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र सचिनचा तूर्तास तरी असा काही इरादा नाही.
सचिनचे चाहते त्याला दैवत मानतात मात्र मी क्रिकेटपटू आहे, जो चुका करतो. देवाच्या आशिर्वादामुळे मी क्रिकेट खेळू शकतो. आतापर्यंत परमेश्वराच्या आशिर्वादामुळेच आतापर्यंतच वाटचाल शक्य झाली. आपण सगळेच चुका करतो. मी माझा खेळ करतो असे सचिनने सांगितले.  सामन्याची तयारी कशी करतोस यावर सचिन म्हणाला, मी मानसिक तयारी अधिक करतो. आयुष्यात गोष्टी किचकट करण्यापेक्षा सोप्या ठेवण्यावर भर देतो असे त्याने पुढे सांगितले.
शाळेत असल्यापासून विजयाचे सेलिब्रेशन साधेसेच असे. मी कोणतेही यश मिळवल्यानंतर घरी गोडाधोडाचा पदार्थ तयार केला जात असे. लोकांना सामन्याबद्दल बोलू दे, तु वाटचाल करत राहा असा सल्ला माझा भाऊ मला देत असे. माझी जीवनशैली संतुलित आहे असे सचिनने सांगितले.

Story img Loader