सध्याच्या घडीला तुमचा सर्वात आवडता खेळाडू कोण?? असा प्रश्न विचारला तर अनेक जण विराट कोहली, रोहित शर्मा, स्टिव्ह स्मिथ किंवा त्यांच्या आवडीच्या खेळाडूंची नावं सांगतील. मात्र वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार ब्रायन लाराने आपला सर्वात आवडता खेळाडू म्हणून लोकेश राहुलची निवड केली आहे. Road Safety World Series स्पर्धेदरम्यान तो पत्रकारांशी बोलत होता.

“मी जास्त करुन विंडीज क्रिकेट पाहत असतो. नुकत्याच पार पडलेल्या लंकेविरुद्ध टी-२० मालिकेत त्यांनी चांगली कामगिरी केली. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. रोहित, विराट, स्मिथ…पण लोकेश राहुल हा माझा सर्वात आवडता खेळाडू आहे.” Sportsstar संकेतस्थळाशी बोलताना लाराने आपलं मत मांडलं.

गेल्या काही दिवसांत लोकेश राहुल चांगल्या फॉर्मात आहे. न्यूझीलंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेत राहुलने चांगली कामगिरी केली. मात्र कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली नव्हती. राहुलला कसोटी मालिकेत स्थान नाकारल्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी नाराजीही व्यक्त केली होती. दरम्यान आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी लोकेश राहुलचं भारतीय संघात पुनरागमन झालेलं आहे.

Story img Loader