विंडीजपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलला भारतीय संघातून विश्रांती देण्यात आली. नवोदीत खेळाडूंना संधी मिळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केलं होतं. मात्र संघात आपल्याला स्थान मिळालं नसलं तरीही कुलदीपला त्याची चिंता वाटत नाहीये. नुकत्याच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपली बाजू स्पष्ट केली.
“मी आतापर्यंत मर्यादीत षटकांच्या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. टी-२० मालिकेत मला संघात स्थान मिळालं नाही याची मला चिंता वाटत नाही. कदाचीत मला विश्रांतीची गरज आहे असा निवड समितीने विचार केला असेल, किंवा संघात काहीतरी बदल आवश्यक असतील. मला कोणत्याही गोष्टीची तक्रार करायची नाही. याचा फायदा मी कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःची कामगिरी सुधारण्याकडे देईन.” कुलदीप यादव पीटीआयशी बोलत होता.
मैसूर येथे पार पडलेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात कुलदीपला भारत अ संघात स्थान देण्यात आलं होतं. दक्षिण आफ्रिका अ संघाने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. कुलदीपने या सामन्यात २९ षटकं टाकत १२१ धावा देत ४ बळी घेतले.