लंडन : टेनिस विश्वातील सर्वांत यशस्वी खेळाडू नोव्हाक जोकोविचने पुन्हा सहज विजयासह विम्बल्डन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, या वेळी तो विम्बल्डनच्या प्रेक्षकांवर नाराज होता. जोकोविचने सेंटर कोर्टवरील लढतीत होल्गर रुनला अवघ्या दोन तासांत ६-३, ६-४, ६-२ असे हरवले. मात्र, लढतीदरम्यान प्रतिस्पर्धी रुनला मिळणाऱ्या पाठिंब्यावर तो नाराज होता. सामन्यानंतर कोर्टवर बोलताना जोकोविचने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली.
हेही वाचा >>> इंग्लंडला कामगिरीत सुधारणेची आस; आज नेदरलँड्सविरुद्ध उपांत्य लढत; प्रमुख खेळाडू चमकण्याची गरज
रुनला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचे चाहते ‘रुउउउन’ असे मोठ्याने ओरडत होते. मात्र, एखाद्या व्यक्तीविरुद्ध शेरेबाजी करताना जसे ‘बू’ असा आवाज काढला जातो, तसे काहीसे ऐकू येत होते, अशी जोकोविचची भावना होती.
सामन्यानंतर कोर्टवर जोकोविचची मुलाखत घेणाऱ्याने सगळे प्रेक्षक रुनचा जयजयकार करत होते असे त्याला सांगितले. तेव्हा जोकोविचला राग अनावर झाला. ‘‘मला हे मान्य नाही. ते भलेही रुनला प्रोत्साहित करत असतील, पण तेही मला ‘बू’ करण्यासाठीचे एक निमित्त आहे. मी २० वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक टेनिस खेळत आहे. मला चाहत्यांच्या सर्व युक्त्या माहीत आहेत. मात्र, तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही,’’ असे जोकोविच म्हणाला. ‘‘यानंतरही मी प्रेक्षकांचा आदर करतो. खेळ आणि खेळाडू दोघांची प्रशंसा करण्यासाठी ते येथे तिकीट काढून येतात,’’ असे जोकोविच म्हणाला.