जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच आणि गतविजेता स्टॅनिस्लॉस वावरिंका यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली आहे. महिलांमध्ये बिगरमानांकित आणि जेतेपदासाठी दावेदार समजली जाणारी व्हिक्टोरिया अझारेंका हिने सलामीची लढत जिंकत दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. १८वेळा ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या सेरेना विल्यम्सनेही पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार करत दुसरी फेरी गाठली.
सर्बियाच्या अव्वल मानांकित जोकोव्हिचने पाचव्या ऑस्ट्रेलियन जेतेपदाच्या दिशेने कूच करताना स्लोव्हेनियाच्या अल्जाझ बेडेने याचे आव्हान ६-३, ६-२, ६-४ असे संपुष्टात आणले. नुकत्याच झालेल्या चेन्नई एटीपी स्पर्धेत दिग्गज प्रतिस्पध्र्याना धूळ चारत बेडेने याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे जोकोव्हिचला खडतर आव्हानाला सामोरे जावे लागेल, अशी अपेक्षा होती. पण जोकोव्हिचने प्रतिस्पध्र्याला डोके वर काढण्याची कोणतीही संधी न देता सहज विजय साकारला.
‘‘पहिल्या फेरीतील विजय नेहमीच समाधानकारक असतो. पण मला काही गोष्टींवर अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. मी अजूनही खेळात सुधारणा
करत आहे,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.
स्वित्र्झलडच्या चौथ्या मानांकित वावरिंकाने जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने आगेकूच करताना तुर्कस्तानच्या मार्सेल इलहानचा ६-१, ६-४, ६-२ असा पाडाव केला. गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत मारिन चिलीचकडून पराभव पत्करावा लागलेल्या जपानच्या केई निशीकोरीने निकोलस अल्माग्रोचा ६-४, ७-६(७/१), ६-२ असा पराभव केला.
महिलांमध्ये दोन वेळा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करणाऱ्या अझारेंकाने दुखापतीमुळे २०१४ मोसमातील जवळपास सर्वच स्पर्धामधून माघार घेतली होती. पण अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्स हिला ६-३, ६-२ अशी धूळ चारत आपण पुढील मोसमासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. तिचा दुसऱ्या फेरीतील मुकाबला आठव्या मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकीशी होणार आहे. वॉझ्नियाकीने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या टेलर टाउनसेंडचे आव्हान ७-६ (७/१), ६-२ असे परतवून लावले. दोन वेळा विम्बल्डनवर नाव कोरणाऱ्या पेट्रा क्विटोव्हाने नेदरलँड्सच्या रिचेल होगेनकॅम्प हिच्यावर ६-१, ६-४ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा