अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने सलामीच्या सामन्याचे कोणतेही दडपण न घेता अर्जेटिनाच्या दिएनो श्वार्ट्झमन याचे आव्हान सहजपणे परतवून लावत अमेरिकन खुल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. रशियाच्या मारिया शारापोव्हाने आपल्याच देशाच्या मारिया किरिलेंको हिचा धुव्वा उडवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोव्हिचने ७९व्या क्रमांकावरील श्वार्ट्झमनला ६-१, ६-२, ६-४ अशी पराभवाची धूळ चारली. कारकिर्दीतील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि हार्डकोर्टवरील पहिली स्पर्धा खेळणाऱ्या श्वार्ट्झमनचा जोकोव्हिचच्या दमदार खेळापुढे निभाव लागला नाही. मात्र श्वार्ट्झमनने जोकोव्हिचची सर्विस एकदा भेदण्यात यश मिळवले. तिसऱ्या सेटमध्ये २-३ अशा पिछाडीवर असताना श्वार्ट्झमनने सर्विस भेदत ३-३ अशी बरोबरी साधली. पण दुसऱ्या अमेरिकम ग्रँड स्लॅम जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचने पुढील गेममध्ये त्याची सर्विस मोडीत काढत विजय साकारला.
गतविजेत्या अँडी मरेला विजयासाठी संघर्ष करावा लागला. नेदरलँड्सच्या रॉबिन हासेने त्याला कडवी लढत दिली, पण अखेर मरेने हा सामना ६-३, ७-६ (८/६), १-६, ७-५ असा जिंकला. ‘‘पाचव्या सेटमध्ये सामना गेला असता तर मी सहजपणे पराभूत झालो असतो,’’ असे मरेने विजय मिळव्ल्यानंतर सांगितले. फ्रान्सच्या नवव्या मानांकित जो-विल्फ्रेड त्सोंगाने अर्जेटिनाच्या जुआन मोनॅकोवर ६-३, ४-६, ७-६ (७/२), ६-१ असा विजय मिळवला.
महिलांमध्ये, शारापोव्हाने किरिलेंकोला ६-४, ६-० असे पराभूत करून आगेकूच केली. डेन्मार्कच्या कॅरोलिन वॉझ्नियाकीला स्लोव्हाकियाच्या मॅग्दलेना रायबरीकोव्हा हिच्यावर विजय मिळवण्यासाठी घाम गाळावा लागला. पण सामना ६-१, ३-६, २-० अशा स्थितीत असताना रायबरीकोव्हाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे वॉझ्नियाकीला विजयी घोषित करण्यात आले. सर्बियाच्या जेलेना जांकोविचने बोजाना जोवानोव्हस्की हिला ६-२, ६-३ असे सहज पराभूत केले. व्हीनस विल्यम्सने जपानच्या किमिको डेट क्रम हिच्यावर २-६, ६-३, ६-३ अशी मात केली.

Story img Loader