विम्बल्डनपाठोपाठ आणखी एक ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अँडी मरेवर विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. याचप्रमाणे जपानच्या युवा केई निशिकोरीने स्टॅनिसलॉस वॉवरिंकाचे आव्हान मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. महिलांमध्ये सेरेना विल्यम्सने फ्लॅव्हिआ पेनेट्टाला नमवत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असणाऱ्या जोकोव्हिचने अँडी मरेवर ७-६ (७-१), ६-७ (१-७),
६-२, ६-४ अशी मात केली. २०११मध्ये या स्पर्धेचे जेतेपद कमावणाऱ्या जोकोव्हिचने सलग आठव्यांदा अमेरिकन खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अन्य लढतीत जपानच्या निशिकोरीने अमेरिकन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठताना एक प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आणली. तब्बल ९६ वर्षांनंतर अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंत धडक मारण्याची किमया साधणारा तो जपानचा पहिला खेळाडू ठरला आहे. २४ वर्षीय निशिकोरीने ४ तास आणि १५ मिनिटांच्या लढतीत वॉवरिंकावर ३-६, ७-५, ७-६ (९-७), ६-७ (५-७), ६-४ असा विजय मिळवला. पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील निशिकोरीला उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या जोकोव्हिचचा सामना करावा लागणार आहे.
महिलांमध्ये अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने फ्लॅव्हिआ पेनेट्टाचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. यंदाच्या वर्षांत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळणाऱ्या सेरेनाने अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या सलग तिसऱ्या आणि एकूण सहाव्या जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली. रशियाच्या एकाटेरिना माकारोव्हाने व्हिक्टोरिया अझारेन्कावर ६-४, ६-२ अशी मात करत उपांत्य फेरीत आगेकूच केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा