जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. त्याने अंतिम फेरीत अँडी मरेवर ७-६ (७-३), ४-६, ६-० अशी मात केली.
सर्बियन खेळाडू जोकोव्हिचचा मरे याच्याविरुद्धचा हा १८वा विजय आहे. विजेतेपदानंतर जोकोव्हिच म्हणाला, ‘‘या मोसमात मी तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. यासारखा शानदार प्रारंभ होऊ शकत नाही. विशेषत: फ्रेंच स्पर्धेपूर्वी मिळालेल्या या विजेतेपदामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे.’’
जोकोव्हिचने सहा आठवडे अग्रमानांकन भूषविले आहे. या स्पध्रेतील उपविजेतेपदामुळे मरे याला तिसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी मिळणार आहे. त्याने यापूर्वी जोकोव्हिचवर २०१३च्या विम्बल्डन स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय मिळविला होता.
जोकोव्हिच व मरे यांच्यात येथे झालेल्या अंतिम लढतीत पहिल्या दोन सेट्समध्ये चिवट झुंज पाहावयास मिळाली. पहिल्या सेटमधील पहिल्या आठ गेम्समध्ये चार वेळा सव्र्हिसब्रेक नोंदविला गेला. मात्र टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने ४-० अशी झटपट आघाडी घेतली. डबल फॉल्ट होऊनही त्याने हा टायब्रेकर ७-३ असा घेतला. दुसऱ्या सेटमध्ये मरे याने पासिंग शॉट्सचा बहारदार खेळ करीत दहाव्या गेमच्या वेळी सव्र्हिसब्रेक नोंदविला व हा सेट घेत १-१ अशी बरोबरी साधली. तथापि तिसऱ्या सेटमध्ये जोकोवीच याच्या वेगवान खेळापुढे मरे याचा खेळ निष्प्रभ ठरला. या सामन्यात मोठय़ाने ओरडल्याबद्दल जोकोव्हिचला पंचांकडून ताकीदही मिळाली.
जोकोव्हिच अजिंक्य
जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत पाचव्यांदा विजेतेपद मिळवले.
First published on: 07-04-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic beats andy murray to win fifth miami open title