जोकोव्हिचची पहिल्या फ्रेंच खुल्या चषकाला गवसणी; ग्रँड स्लॅम जेतेपदांचा विक्रम
ऑस्ट्रेलियन खुली, फ्रेंच खुली, विम्बल्डन आणि अमेरिकन या ग्रँड स्लॅम स्पर्धाची चौकट म्हणजे टेनिस विश्वाचा परीघ. चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर कब्जा करणे हा दुर्मीळ विक्रम. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची सद्दी मोडत नोव्हाक जोकोव्हिचने ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरण्याची परंपरा सुरु केली. मात्र फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाने त्याला सातत्याने हुलकावणी दिली होती. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत अँडी मरेवर मात करत जोकोव्हिचने १२व्या प्रयत्नात फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला आणि ग्रँड स्लॅम विजयाची चौकट पूर्ण
झाली. चारही ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या मोजक्या दिग्गजांच्या पंक्तीत चौकट राजा जोकोव्हिचने स्थान पटकावले.
अंतिम लढतीत जोकोव्हिचने मरेवर ३-६, ६-१, ६-२, ६-४ असा विजय मिळवत इतिहास घडवला. याआधी डॉन ब्युज, रॉड लेव्हर आणि खुल्या स्पर्धाच्या कालावधीत आंद्रे आगासी, रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या विक्रमाधीशांच्या मांदियाळीत जोकोव्हिच विराजमान झाला. सलग चारही ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरण्याचा विक्रमही जोकोव्हिचने नावावर केला. या विजयासह जोकोव्हिचने मरेविरुद्धची कामगिरी २४-१० अशी सुधारली.
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी दुखापतीच्या कारणास्तव माघार घेतल्याने जोकोव्हिचचा ग्रँड स्लॅम जेतेपदांचे वर्तुळ पूर्ण करण्याचा मार्ग सुकर झाला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे विस्कटलेल्या वेळापत्रकाचा कोणताही परिणाम होऊ न देता जोकोव्हिचने अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत मरेने पहिल्या सेटमध्ये शानदार खेळ करत बाजी मारली. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीत पहिला सेट जिंकणाऱ्या खेळाडूला जेतेपदाचा दावेदार मानला जातो. मात्र मरेच्या खेळाचा चोख अभ्यास करून आलेल्या जोकोव्हिचने पुढच्या तिन्ही सेटमध्ये मरेला निष्प्रभ करत सरशी साधली.
‘ग्रँड स्लॅम जेतेपदांची चौकट पूर्ण केल्याची भावना अनोखी आहे. माझ्या कारकीर्दीतला हा सर्वोत्तम क्षण आहे. रोलँड गॅरोसवर दाखल झाल्यावर एक वेगळीच भावना मनात दाटली. असे यापूर्वीच कधीही जाणवले नव्हते. त्या सुखद मानसिक स्थितीतच मी जेतेपद पटकावले. चाहत्यांचा पाठिंबा अभूतपूर्व असा होता’,
असे जोकोव्हिचने सांगितले.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीदरम्यान जोकोव्हिचने रागाने रॅकेट फेकली होती. ही रॅकेट मैदानावरील पंचाच्या बाजूला पडली. नियमानुसार ही रॅकेट पंचांना लागली असती तर जोकोव्हिचला स्पर्धेतून बाद व्हावे लागले असते. मैदानावरील या वर्तनाबद्दल जोकोव्हिचने माफीही मागितली. नशिबाने दिलेल्या साथीच्या बळावर जोकोव्हिचने जेतेपदापर्यंत वाटचाल केली. दडपणाच्या अंतिम लढतीत काही निर्णयानंतर जोकोव्हिचचा राग अनावर झाला होता. मात्र विचलित न होता दिमाखदार खेळ करत सर्वोत्तम कोण हे जोकोव्हिचने सिद्ध केले.
पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिचच्या हातून झालेल्या १३ चुकांचा फायदा उठवत मरेने सरशी साधली. अचूक सव्‍‌र्हिस, खणखणीत परतीचे फटके आणि सर्वागीण वावर यांच्या बळावर जोकोव्हिचने दुसरा सेट जिंकत बरोबरी केली. बॅकहँड, क्रॉसकोर्टच्या फटक्यांचा खुबीने उपयोग करत जोकोव्हिचने तिसरा सेट नावावर केला. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचने ५-२ अशी भक्कम आघाडी घेतली. चिवट खेळासाठी प्रसिद्ध मरेने झुंज देत विजय लांबवला. मात्र तीन तासांच्या अविरत प्रयत्नानंतर जोकोव्हिचने विजयी फटका लगावला. या विजयासह महानतेच्या मखरात जोकोव्हिच विराजमान झाला.

01

02

03

04

Story img Loader