नोव्हाक जोकोव्हिचने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालवर मात करत एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले. एक तास आणि ३६ मिनिटांच्या लढतीत जोकोव्हिचने नदालचा सरळ सेट्समध्ये ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. या विजयासह जोकोव्हिचने यशस्वीपणे जेतेपद कायम राखले. वर्षांच्या सुरुवातीस होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदानंतर जोकोव्हिचला ग्रँडस्लॅम स्पर्धाच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेतही अंतिम लढतीत नदालने जोकोव्हिचवर विजय मिळवला होता. वर्षांत सातत्यपूर्ण खेळ करत नदालने क्रमवारीत जोकोव्हिचला मागे टाकत अव्वल स्थानही काबीज केले. मात्र टेनिस हंगामाच्या अंतिम टप्प्यात होणाऱ्या या स्पर्धेत जोकोव्हिचने नदालवर सरशी साधली.

Story img Loader