तंत्रकौशल्य, तंदुरुस्ती आणि ग्रँड स्लॅम जेतेपदाची ऊर्मी अशा तिन्ही आघाडय़ांवर रॉजर फेडररवर सरशी साधत नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह जोकोव्हिचने सलग पाचव्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. महिला गटात सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक्यू कर्बर यांच्यात जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे. सेरेनाने अ‍ॅग्निझेस्का रडवानस्कावर मात केली, तर कर्बरने जोहाना कोन्टाचे आव्हान संपुष्टात आणले. भारताच्या सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीत इव्हान डोडिगच्या साथीने अंतिम फेरीत आगेकूच केली.
‘सार्वकालीन महानता आणि आधुनिक सर्वोत्तमता’ असे वर्णन झालेल्या मुकाबल्यात जोकोव्हिचने फेडररवर ६-१, ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदापासून जोकोव्हिच केवळ एक विजय दूर आहे. या विजयासह जोकोव्हिचने फेडररविरुद्धच्या ४५ लढतींत २३-२२ अशी निसटती आघाडी घेतली आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत फेडररविरुद्धच्या सातपैकी सहा सामन्यांत जोकोव्हिचने विजयी वर्चस्व राखले आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला हा मुकाबला तुल्यबळ होण्याची अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या सेटमधला फेडररचा खेळ वगळता जोकोव्हिचने एकतर्फी विजय नोंदवला. अवघ्या २२ मिनिटांत जोकोव्हिचने पहिला सेट नावावर केला. फेडररच्या बॅकहँड फटक्याची अचूकता हरवली आणि त्याच्या चुकांचे प्रमाणही वाढले. पुढच्या अर्धा तासात आक्रमक खेळासह जोकोव्हिचने दुसरा सेटही जिंकला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी फेडररला तिसरा सेट जिंकणे अनिवार्य होते. फेडररने जोकोव्हिचच्या सव्‍‌र्हिसवर हल्लाबोल करत त्याला निष्प्रभ केले.
पावसाच्या विश्रांतीचा पुरेपूर फायदा उठवत जोकोव्हिचने फेडररच्या ‘सर्ब’च्या फटक्याला क्रॉसकोर्टने प्रत्युत्तर देत बाजी मारली.

जेतेपदासाठी सेरेना-कर्बर समोरासमोर
महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अग्रमानांकित सेरेना विल्यम्सने लौकिकाला साजेसा खेळ करत अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या लढतीत सेरेनाने चौथ्या मानांकित अ‍ॅग्निझेस्का रडवानस्कावर ६-०, ६-४ असा सहज विजय मिळवला. या विजयासह सेरेनाने २६व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाटचाल केली. या विजयाबरोबर, सेरेनाने रडवानस्काविरुद्धच्या आठही लढतीत निर्भेळ यशाची परंपरा कायम राखली. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे सातवे जेतेपद पटकावण्यासाठी सेरेना आतुर आहे. अंतिम लढतीत तिचा सामना अँजेलिक्यू कर्बरशी होणार आहे.
सानिया अंतिम फेरीत
सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी इव्हान डोडिग यांनी ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली. उपान्त्य फेरीच्या लढतीत सानिया-डोडिग जोडीने मार्टिना हिंगिस-लिएण्डर पेस जोडीवर सरळ सेट्समध्ये ७-६ (१), ६-३ असा विजय मिळवला. अव्वल मानांकित सानिया-डोडिग जोडीसमोर अंतिम फेरीत एलेना व्हेसनिना आणि ब्रुनो सोरेस यांचे आव्हान असणार आहे. गेल्या वर्षीचा दिमाखदार फॉर्म कायम राखत सानिया-मार्टिना जोडीने महिला दुहेरी प्रकारात अंतिम फेरीत आगेकूच केली आहे. अंतिम फेरीत त्यांची लढत चेक प्रजासत्ताकच्या आंद्रेआ लाव्हाकोव्हा आणि ल्युसी राडेका जोडीशी होणार आहे. या स्पर्धेच्या महिला दुहेरी प्रकाराच्या अंतिम फेरीत खेळण्याची सानियाची ही पहिलीच वेळ असणार आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सेटमध्ये मी अविश्वसनीय खेळ केला. रॉजरसारख्या मातब्बर खेळाडूला नमवण्यासाठी ते आवश्यकच होते. आक्रमक खेळासह तो पुनरागमन करेल याची खात्री होती. मात्र योजनेनुसार खेळ केल्याने विजय मिळवू शकलो. दोन सेटची बढत निर्णायक ठरली.
– नोव्हाक जोकोव्हिच, सर्बियाचा टेनिसपटू

Story img Loader