तंत्रकौशल्य, तंदुरुस्ती आणि ग्रँड स्लॅम जेतेपदाची ऊर्मी अशा तिन्ही आघाडय़ांवर रॉजर फेडररवर सरशी साधत नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विजयासह जोकोव्हिचने सलग पाचव्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. महिला गटात सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक्यू कर्बर यांच्यात जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे. सेरेनाने अॅग्निझेस्का रडवानस्कावर मात केली, तर कर्बरने जोहाना कोन्टाचे आव्हान संपुष्टात आणले. भारताच्या सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीत इव्हान डोडिगच्या साथीने अंतिम फेरीत आगेकूच केली.
‘सार्वकालीन महानता आणि आधुनिक सर्वोत्तमता’ असे वर्णन झालेल्या मुकाबल्यात जोकोव्हिचने फेडररवर ६-१, ६-२, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या सहाव्या जेतेपदापासून जोकोव्हिच केवळ एक विजय दूर आहे. या विजयासह जोकोव्हिचने फेडररविरुद्धच्या ४५ लढतींत २३-२२ अशी निसटती आघाडी घेतली आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धेत फेडररविरुद्धच्या सातपैकी सहा सामन्यांत जोकोव्हिचने विजयी वर्चस्व राखले आहे. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला हा मुकाबला तुल्यबळ होण्याची अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या सेटमधला फेडररचा खेळ वगळता जोकोव्हिचने एकतर्फी विजय नोंदवला. अवघ्या २२ मिनिटांत जोकोव्हिचने पहिला सेट नावावर केला. फेडररच्या बॅकहँड फटक्याची अचूकता हरवली आणि त्याच्या चुकांचे प्रमाणही वाढले. पुढच्या अर्धा तासात आक्रमक खेळासह जोकोव्हिचने दुसरा सेटही जिंकला. सामन्यातले आव्हान जिवंत राखण्यासाठी फेडररला तिसरा सेट जिंकणे अनिवार्य होते. फेडररने जोकोव्हिचच्या सव्र्हिसवर हल्लाबोल करत त्याला निष्प्रभ केले.
पावसाच्या विश्रांतीचा पुरेपूर फायदा उठवत जोकोव्हिचने फेडररच्या ‘सर्ब’च्या फटक्याला क्रॉसकोर्टने प्रत्युत्तर देत बाजी मारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा