केव्हीन अँडरसन.. दक्षिण आफ्रिकन टेनिसपटूंमध्ये तो अव्वल स्थानावर असला तरी जागतिक क्रमवारीत तो ७०व्या स्थानावर आहे.. त्याने एक तप टेनिस क्षेत्रात घालवून जेमतेम एकच जेतेपद पटकावण्यात यश मिळवले.. तरीही जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचला त्याने विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत झुंजवले.. आफ्रिकेच्या २९ वर्षीय अँडरसनने मंगळवारी अनपेक्षित खेळ करताना जोकोव्हिचला विजयासाठी संघर्ष करायला लावला. अँडरसनवर अगदी सहज विजय मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश करू, असा आत्मविश्वास जोकोव्हिचला डोईजड ठरला. अँडरसनने एक-एक गुणासाठी त्याला झुंजवले. अखेर चिवट खेळाडू म्हणून ओळखणाऱ्या जोकोव्हिचने ३ तास ४७ मिनिटांच्या लढतीत ६-७ (६-८), ६-७ (६-८), ६-१, ६-४, ७-५ अशी बाजी मारली. या विजयानंतर जोकोव्हिचसह त्याचे प्रशिक्षक बोरीस बेकर आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सोमवारच्या लखलखत्या उन्हात सुरू झालेला हा सामना मंगळवारी संपला. फारसा अनुभव गाठीशी नसलेल्या अँडरसनसमोर आव्हान होते जगातील सर्वोत्तम टेनिसपटू असे बिरुद मिरवणाऱ्या जोकोव्हिचचे. परंतु या आव्हानासमोर न डगमगता त्याने चिवट खेळ केला. पहिल्या सेटपासून त्याने जोकोव्हिचवर आक्रमण सुरुवात केली. त्याने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकून १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येही अँडरसनचा जलवा पाहायला मिळाला. अधिक जलद सव्र्हिस करून अँडरसनने जोकोव्हिचला अवाक केले. त्याच्या सव्र्हिसवर जाकोव्हिचला उत्तर सापडेनासे झाले होते आणि असा अप्रतिम खेळाचा नजराणा सादर करताना अँडरसनने दुसरा सेटही टायब्रेकरमध्ये जिंकून २-० अशी आघाडी पक्की केली.
याआधी अनेकदा ०-२ अशा पिछाडीवरून जोकोव्हिचने मुसंडी मारली असल्याने त्याच्याकडून करिष्म्याची अपेक्षा होती, परंतु अँडरसनच्या झंझावाताने प्रेक्षकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले होते. पहिल्या दोन सेटमध्ये एक-एका गुणासाठी झगडणाऱ्या जोकोव्हिचने मात्र संयमी खेळ करून पुढील दोन्ही सेट अगदी सहज जिंकून सामना २-२ असा बरोबरीत आणला.
या दोघांमधील ही मॅरेथॉन लढत अंधूक प्रकाशामुळे थांबविण्याचा निर्णय आयोजकांना घ्यावा लागला. मंगळवारी डाव पुढे सरकला आणि तोच थरार पुन्हा अनुभवायला मिळाला. अँडरसन आणि जोकोव्हिचमधील युद्ध शिगेला पोहोचले होते. कधी जोकोव्हिच आघाडीवर होता, तर कधी अँडरसन. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये जोकोव्हिचने पिछाडीवरून सामना ५-५ असा बरोबरीवर आणला. या बरोबरीमुळे जोकोव्हिचचा आत्मविश्वास वाढला आणि पुढील दोन गुण सहज जिंकून त्याने ही लढत ३-२ अशी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
पेस-हिंगिस जोडी उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा लिएण्डर पेस आणि स्वित्र्झलडची त्याची जोडीदार मार्टिना हिंगिस या जोडीने विम्बल्डन टेनिस स्पध्रेच्या मिश्र दुहेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित पेस-हिंगिस जोडीने अॅर्टेम सिटॅक आणि अॅनास्टासिआ रोडिओनोव्हा या न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियन जोडीवर ४८ मिनिटांत ६-२, ६-२ असा सोपा विजय मिळवून आगेकूच केली. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी पेस-हिंगिस ही पहिली जोडी आहे.
शारापोव्हा – सेरेना उपांत्य फेरीत भिडणार
रशियाच्या मारिया शारापोव्हाने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या कोको वँडेवेघेवर ६-३, ६-७ (३-७), ६-२ असा २ तास ४६ मिनिटांच्या संघर्षांनंतर विजय साजरा केला. ‘‘पहिल्या आणि दुसऱ्या सेटच्या सुरुवातीला कोकोने दमदार खेळ केला, परंतु सामना तिच्या हातून निसटला. तिने आत्मविश्वासपूर्ण खेळ करताना कडवी झुंज दिली,’’ अशी प्रतिक्रिया शारापोव्हाने सामन्यानंतर दिली. उपांत्य फेरीत शारापोव्हासमोर अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचे आव्हान असणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत बेलारुसच्या विक्टोरीआ अझारेंकाने सेरेनाला विजयासाठी कडवी टक्कर दिली. पहिल्या सेटमध्ये अझारेंकाने बाजी मारून १-० अशी आघाडी घेतली, परंतु तिला पुढील सेटमध्ये सातत्य राखण्यात अपयश आले. सेरेनाने पुढील दोन्ही सेट ६-२, ६-३ अशी जिंकून बाजी मारली.
उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या लढतीत स्पेनच्या गॅर्बिने मुगुरुजाने ७-५, ६-३ अशा फरकाने टाइमा बॅस्कीज्कीचा पराभव केला. पोलंडच्या अग्निस्का रडवान्स्कानेही कडव्या संघर्षांनंतर अमेरिकेच्या मॅडिसन केयसचा ७-६ (७-३), ३-६, ६-३ असा १ तास ५६ मिनिटांत पराभव केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा