लंडन : टेनिस विश्वातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पर्धेत पुन्हा एकदा महिला विभागात नवी विजेती मिळाली असली, तरी पुरुषांमध्ये गेल्या वर्षीच्या अंतिम लढतीची पुनरावृत्ती होणार आहे. आज, रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत गतविजेत्या कार्लोस अल्कराझसमोर गतउपविजेत्या नोव्हाक जोकोविचचे आव्हान असेल.
एक वर्षापूर्वी याच कोर्टवर पाच सेटच्या कडव्या झुंजीनंतर अल्कराझने जोकोविचवर मात करून पहिले विम्बल्डन विजेतेपद मिळवले होते. आता वयाच्या २२ वर्षांच्या आतच विम्बल्डनचे दुसरे विजेतेपद मिळवून अल्कराझला बियॉर्न बोर्ग आणि बोरिस बेकर यांच्या कामगिरीशी बरोबरी करण्याची संधी आहे. टेनिसच्या सर्व प्रकारच्या पृष्ठभागांवर ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणारा अल्कराझ सर्वांत युवा टेनिसपटू आहे.
हेही वाचा >>> Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
अल्कराझ विजेतेपद टिकवण्याच्या प्रयत्नात असतानाच जोकोविच गतवर्षीच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक असेल. जोकोविच विम्बल्डनमधील आठव्या विजेतेपदासह रॉजर फेडररच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी आणि कारकीर्दीतील तब्बल २५वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
‘‘याच कोर्टवर अंतिम फेरीत अल्कराझने मला हरवले आहे. याही वेळी तशीच चुरशीची लढत होईल. अल्कराझ एक परिपूर्ण खेळाडू आहे. त्यामुळे त्याला पराभूत करण्यासाठी मला सर्वोत्तम खेळच करावा लागेल,’’ असे जोकोविच उपांत्य फेरीच्या लढतीनंतर म्हणाला. जोकोविचने उपांत्य फेरीत इटलीच्या लोरेंझो मुसेट्टीला ६-४, ७-६ (७-२), ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले.
स्पर्धेच्या एक महिन्यापूर्वी जोकोविच विम्बल्डन खेळू शकेल की नाही अशी परिस्थिती होती. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे त्याला अनेक स्पर्धांना आणि सरावाला मुकावे लागले होते. मात्र, लंडनमध्ये आल्यावर एक-दोन सराव सामने आणि एक प्रदर्शनीय सामना खेळून जोकोविचने आपल्या क्षमतेची चाचपणी केली. त्यानंतर जोकोविचचा प्रवास आणखी एका अंतिम फेरीपर्यंत येऊन पोहोचला आहे.
● वेळ : सायं. ६.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, हॉटस्टार अॅप