लंडन : दुखापतीमुळे अॅलेक्स डी मिनाऊरने माघार घेतल्याने सर्बियाच्या दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

ऑस्ट्रेलियाच्या नवव्या मानांकित मिनाऊरने जोकोविचविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या काही तासांआधीच स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. चौथ्या फेरीत आर्थर फिल्सविरुद्धच्या विजयादरम्यान मिनाऊरला दुखापत झाल्याची शंका आली. मात्र, त्यावेळी मिनाऊरने ती गांभीर्याने घेतली नाही. मिनाऊरने सामन्यातून माघार घेतल्याने जोकोविचला पुढे चाल मिळाली. जोकोविचने १३व्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. जोकोविचसमोर उपांत्य फेरीत इटलीच्या लॉरेंझो मुसेट्टीचे आव्हान असणार आहे. मुसेट्टीने चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झवर ३-६, ७-६ (७-५), ६-२, ३-६, ६-१ असा विजय मिळवला.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात कझाकस्तानच्या एलिना रायबाकिना व चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेजिकोवाने यांनी विजय नोंदवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. रायबाकिनाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिनावर ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. तर, क्रेजिकोवाने लॅट्वियाच्या येलेना ओस्टापेन्कोला ६-४, ७-६ (७-४) असे पराभूत केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.