वृत्तसंस्था, मियामी गार्डन
वयाच्या चाळिशीकडे झुकलेल्या टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला मियामी खुल्या स्पर्धेच्या अंतिम लढतीत १९ वर्षीय युवा याकुब मेन्सिकचे आव्हान पार करता आले नाही. मेन्सिकने आपला आदर्श खेळाडू जोकोविचला ७-६ (७-४), ७-६ (७-४) असा पराभवाचा धक्का देत कारकीर्दीतील पहिले व्यावसायिक विजेतेपद मिळविले. जोकोविचचे व्यावसायिक विजेतेपदाच्या शतकाचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
अंतिम लढतीच्या सुरुवातीपासून जोकोविचला असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल साडेपाच तासांहून अधिक वेळाच्या विलंबाने सुरू झालेल्या अंतिम लढतीत जोकोविचला मेन्सिकची युवा ताकद आणि जोश याबरोबरच डोळ्याला झालेला संसर्ग, पावसामुळे हवेतील वाढलेली आर्द्रता, तसेच निसरड्या कोर्टच्या आव्हानाचा सामना करावा लागला. ६ फूट ४ इंच अशा उंचपुऱ्या मेन्सिकने सरळ दोन सेटमध्ये जोकोविचला पराभूत करण्याची किमया साधली. ताशी १३० किमी वेगाने येणारी मेन्सिकची सर्व्हिस परतवताना जोकोविचची दमछाक झाली. मेन्सिकने विजय मिळवून आनंद व्यक्त करतानाच जोकोविचलाही आदर दर्शविला. ‘‘तू माझा आदर्श आहेस. तुझ्यामुळेच मी टेनिस खेळायला लागलो. आज मला या क्षणाचे वर्णन करायला शब्द नाहीत,’’ असे मेन्सिक म्हणाला.