न्यूयॉर्क : सर्बियाचा २३ ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी पुनरागमन केले. या विजयासह जोकोविच पुढील आठवडय़ात नव्याने जाहीर करण्यात येणाऱ्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर येणार हे निश्चित झाले आहे.
करोनाची लस न घेतल्याने जोकोविच गेल्या वर्षी अमेरिकन स्पर्धेत खेळू शकला नव्हता. अमेरिकेतील र्निबध उठवण्यात आल्यामुळे या वर्षी जोकोविचच्या सहभागाचा मार्ग मोकळा झाला. जोकोविचने दमदार पुनरागमन करताना सलामीच्या लढतीत फ्रान्सच्या अॅलेक्झांडर मुलरचा ६-०, ६-२, ६-३ असा सहज पराभव केला.
या विजयामुळे जोकोविच पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर येणार आहे. सध्या स्पेनचा कार्लोस अल्कराझ अग्रस्थानावर असून, जोकोविचला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्यासाठी अमेरिकन स्पर्धेची दुसरी फेरी गाठणे आवश्यक होते.
हेही वाचा >>> आशिया चषक: माघार, बहिष्कार, रद्द, कधी वनडे कधी ट्वेन्टी२०-डगमगणारं वारु
दरम्यान, महिला एकेरीत अमेरिकेच्या कोको गॉफला पहिल्याच फेरीत विजयासाठी संघर्ष करावा लागला. पात्रता फेरीतून आलेल्या जर्मनीच्या लॉरा सिगमंडने कोकोला तीन सेटपर्यंत झुंजवले. मात्र, कोकोने अखेरीस हा सामना ३-६, ६-२, ६-४ असा जिंकला. अव्वल मानांकित इगा श्वीऑनटेकने पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार करताना रेबेका पीटरसनचा ६-०, ६-१ असा पराभव केला. आठव्या मानांकित मारिया सक्कारीला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रेबेका मासारोवाने सक्कारीचे आव्हान ६-४, ६-४ असे संपुष्टात आणले.
पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित होल्गर रुनचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. क्रमवारीत ६३व्या स्थानावर असलेल्या रोबेटरे कार्बालेस बाएनाने रुनला ६-३, ४-६, ६-३,
६-२ असा पराभवाचा धक्का दिला. तीन वर्षांपूर्वी या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या डॉमिनिक थिमने २५व्या मानांकित अॅलेक्झांडर बुब्लिकला ६-३, ६-२, ६-४ असे नमवले. थिम २०२१च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेनंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत आहे.
बराक आणि मिशेल ओबामांची उपस्थिती
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी सोमवारी अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आर्थर अॅश कोर्टवर उपस्थिती लावली. ओबामांनी कोको गॉफच्या पहिल्या फेरीच्या लढतीचा आनंद घेतला. लढतीनंतर मिशेल ओबामा यांनी अमेरिकन स्पर्धेच्या समान पुरस्कार पारितोषिक रकमेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने बिली जीन किंग यांचा सन्मान केला.