जागतिक क्रमवारीत अव्वल नोव्हाक जोकोव्हिचला खेळताना याचि देहा याचि डोळा पाहण्याचे भारतवासियांचे स्वप्न लांबणीवर पडले आहे. १२ ते १४ सप्टेंबर या कालावधीत बंगळुरू येथे भारत आणि सर्बिया यांच्यात डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचा सामना होणार आहे. सर्बियाने घोषित केलेल्या संघात जोकोव्हिचच्या नावाचा समावेश होता. मात्र थकव्याच्या कारणांमुळे जोकोव्हिचने या लढतीतून माघार घेत असल्याचे सर्बियाचा कर्णधार बोगडेन ओबराडोव्हिक याने सांगितले.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिच जेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. मात्र जपानच्या केई निशिकोरीने शानदार खेळ करत उपांत्य फेरीत जोकोव्हिचचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेनंतर जोकोव्हिच भारतात येणार होता. मात्र तंदुरुस्तीच्या कारणास्तव तो खेळणार नाही. याबरोबरच गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी जोकोव्हिचने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जोकोव्हिचच्या ऐवजी सर्बियाच्या संघात इलिजा बोझोलिकला संधी मिळण्याची शक्यता आहे.
भारतात चॅलेंजर स्पर्धा खेळलेला बोझोलिक सर्बियाचा राखीव खेळाडू असून, तो बंगळुरूत दाखल झाला आहे. याव्यतिरिक्त सर्बियाने दुसान लाजोव्हिक, फिलीप क्रॅन्जोव्हिक आणि नेनाद झिम्नोझिक यांना संघात समाविष्ट केले आहे.
दरम्यान सोमदेव देववर्मन आणि युकी भांब्री हे एकेरीत भारताचे प्रतिनिधित्त्व करतील तर दुहेरीत लिएण्डर पेस रोहन बोपण्णाच्या साथीने खेळणार आहे. पेसच्या समावेशामुळे साकेत मायनेनीला संधी मिळणार नाही.