संथ सुरुवातीनंतर नोव्हाक जोकोव्हिचने स्वत:ला सावरत चिकाटीने खेळ करणाऱ्या स्पेनच्या डेव्हिड फेररवर विजय मिळवून मियामी मास्टर्स टेनिस स्पध्रेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान असलेल्या सर्बियाच्या जोकोव्हिचने ७-५, ७-५ अशा फरकाने फेररवर मात केली. उपांत्य फेरीत त्याला अमेरिकेच्या जॉन इस्नरचा सामना करावा लागणार आहे. इस्नरने  जपानच्या केई निशिकोरीचा ६-४, ६-३ असा पराभव केला.
गतविजेता आणि नुकतेच इंडियन वेल्स स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये ०-२ अशा गुणांच्या पिछाडीनंतर अप्रतिम खेळ केला आणि पहिला सेट ७-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने ५-४ अशी आघाडी घेत विजयाकडे कूच केली होती, परंतु फेररने आक्रमक खेळ करून सामन्यात चुरस निर्माण केली. अखेर अनुभवाच्या जोरावर जोकोव्हिचने हाही सेट जिंकून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

आव्हानात्मक प्रतिस्पध्र्यामध्ये डेव्हिडचे नाव आवर्जून घेईन. शारीरिक कसोटी पाहणारा हा सामना होता. फेररकडून चुकांची अपेक्षाच नव्हती. प्रत्येक गुणासाठी त्याने झुंजवले.   
-नोव्हाक जोकोव्हिच
 

Story img Loader