वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूच्या पुरस्काराने तिसऱ्यांदा सन्मानित
नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्स, टेनिस जगतातील या दोन दिग्गज खेळाडूंना मंगळवारी ‘लॉरेस जागतिक क्रीडा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. नोव्हाक आणि सेरेना यांनी अनुक्रमे पुरुष व महिला विभागात तिसऱ्यांदा वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूंचा मान पटकावला. जगभरातील विविध क्रीडा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत हा सोहळा बर्लिन येथे पार पडला. या वेळी माजी फॉम्र्युला वन विश्वविजेता निकी लॉडाला ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
नोव्हाकने यापूर्वी २०१२ आणि २०१५मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. २०१५च्या हंगामात नोव्हाकने ऑस्ट्रेलिया, विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या स्पध्रेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा ठसा उमटवला, तर फ्रान्स खुल्या स्पध्रेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे त्याला लॉरेस पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘मला अभिमान वाटत आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांशिवाय हे शक्य नव्हते. टेनिसप्रति असलेले प्रेम आणि आवड यामुळेच मी इथपर्यंत आलो. या खेळाने अनेक मार्गाने मला प्रेरणा दिली आहे. मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा पुरस्कार समर्पित.’
फॉम्र्युला-वन शर्यतीतील शर्यतपटू निको रोसबर्ग याच्या हस्ते नोव्हाकला हा पुरस्कार देण्यात आला. आघाडीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला पाचव्यांदा या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, परंतु पुन्हा त्याच्या वाटय़ाला निराशा आली. महिला विभागात सेरेनाच प्रबळ दावेदार होती. गेल्या हंगामात तिने तीन ग्रँड स्लॅम (ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, विम्बल्डन) स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळेच तिला गौरविण्यात आले. यापूर्वी तिने २००३ आणि २०१० साली हा पुरस्कार पटकावला होता. काही कारणास्तव तिला या सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही.
टेनिससाठी ही अवघड वेळ आहे. सामना निश्चिती, बेटिंग, उत्तेजक सेवन प्रकरण टेनिस या खेळाशी जोडलेले असल्याचे वृत्त दररोज वाचण्यात येत आहेत. त्यामुळे टेनिसच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे, परंतु उत्तेजक प्रतिबंधक संस्था, सरकारी यंत्रणा यांनी पुरावे सादर करावेत. त्यांच्याकडे ते नसतील, तर या अफवा आहेत. स्वच्छ प्रतिमा असलेल्या खेळाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.
– नोव्हाक जोकोव्हिच
पुरस्काराचे मानकरी
सर्वोत्तम क्रीडापटू (पुरुष) : नोव्हाक जोकोव्हिच (सर्बिया, टेनिस)
सर्वोत्तम क्रीडापटू (महिला) : सेरेना विल्यम्स (अमेरिका, टेनिस)
सर्वोत्तम संघ : न्यूझीलंड, रग्बी
कलाटणी देणारा खेळाडू : जॉर्डन स्पिएथ (अमेरिका, गोल्फ)
दमदार पुनरागमन करणारा खेळाडू : डॅन कार्टर (न्यूझीलंड, रग्बी)
सर्वोत्तम क्रीडापटू (विकलांग विभाग) : डॅनिएल डायस (ब्राझील, जलतरण)
सर्वोत्तम शैलीदार खेळाडू : जॅन फ्रोडेनो (जर्मनी, ट्रायथ्लॉन)