वृत्तसंस्था, माद्रिद

खेळाडूपेक्षा खेळ कधीही मोठा असतो आणि याचाच प्रत्यय टेनिसमध्ये येत आहे. रॉजर फेडरर, राफेल नदाल या दिग्गजांचा खेळ आपल्याला यापुढे पाहायला मिळणार नसल्याचे चाहत्यांनी स्वीकारले आहे. येत्या काही वर्षांत मीसुद्धा निवृत्त होईन. आता नवे खेळाडू पुढे येत असून ते चाहत्यांना आकर्षित करत आहेत, असे वक्तव्य २४ ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने केले.

३७ वर्षीय जोकोविच सध्या माद्रिद खुल्या स्पर्धेत खेळत आहे. ही स्पर्धा जिंकून कारकीर्दीतील १००वे ‘एटीपी टूर’ जेतेपद मिळविण्यासाठी तो उत्सुक आहे. ‘‘टेनिसमध्ये आता बदल होताना मी पाहत आहे. आता नव्या पिढीतील खेळाडू पुढे येत असून चाहते त्यांच्याकडे अधिक आकर्षित होत आहेत. खेळाच्या दृष्टीने हे उत्तमच आहे. खेळाडूपेक्षा कधीही खेळच मोठा असायला हवा. खेळाडू येणार आणि जाणार, पण खेळ कधीही मागे पडता कामा नये. रॉजर, राफा, अँडी मरे हे आता निवृत्त झाले आणि काही वर्षांत मीसुद्धा खेळापासून दूर जाईन हे सत्य आहे. या बदलाशी जुळवून घेण्यास चाहत्यांनी सुरुवात केली आहे,’’ असे जोकोविचने नमूद केले.

‘‘माजी खेळाडू त्यांचे योगदान देऊन जातात. मात्र, कोणत्याही खेळाने आपली लोकप्रियता टिकविण्यासाठी माजी खेळाडूंवर अवलंबून राहता कामा नये. टेनिसमध्ये नवे खेळाडू उदयास येत असल्याचे पाहून आनंद होतो. आम्ही २३ ते ३३ या वयात सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, आताचे खेळाडू कमी वयातच वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. कार्लोस अल्कराझ अजून २३ वर्षांचाही झालेला नाही आणि तो चार ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी आहे. तो पुढील दशक दबदबा राखेल याची खात्री वाटते,’’ असे जोकोविच म्हणाला.