Novak Djokovic talk On Friendship With Virat Kohli : जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने अलीकडेच खुलासा केला आहे. तो म्हणाला, भारतात येण्यापूर्वी त्याचे क्रिकेट कौशल्य सुधारण्यासाठी विराट कोहलीशी चॅटिंग करत आहे आणि त्याच्या संपर्कात आहे. जोकोविच २०२४ च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये क्वालिफायर डिनो प्रिझमिकविरुद्ध त्याच्या मोहिमेची सुरुवात करेल. जोकोविच हा गतविजेता आहे. या सर्बियन खेळाडूने अलीकडेच ग्रँड स्लॅमपूर्वी एका मुलाखतीत विराटबद्दल अनेक मजेशीर विधाने केली. भारताचा माजी टेनिसपटू सोमदेव देववर्मन याच्याशी झालेल्या संभाषणात त्याने भारताबद्दलचे प्रेम व्यक्त करताना कौतुकही केले.
२४ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियनने १० वर्षांपूर्वी आलेल्या शेवटच्या भारत भेटीची आठवण सांगितली. तो रॉजर फेडरर आणि इतर टेनिस स्टार्ससह आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीग नावाच्या प्रदर्शनी स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात आला होता. जोकोविचने लवकरच भारताला भेट देऊन देशाचे सौंदर्य, इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
तो म्हणाला, ‘मी आतापर्यंत आयुष्यात एकदाच भारतात आलो आहे. मला वाटते, मी १० किंवा ११ वर्षांपूर्वी आला होतो. एक प्रदर्शनी स्पर्धा खेळण्यासाठी मी दोन दिवस नवी दिल्लीत आलो होतो. तेव्हा फार कमी वेळ होता. त्यामुळे नजीकच्या भविष्यात मी तिथे नक्कीच जाईन अशी आशा आहे. माझी खूप इच्छा आहे. एवढा प्रदीर्घ इतिहास, जगाला आणि अध्यात्मही देऊ शकेल इतकी संस्कृती असलेल्या त्या सुंदर देशाबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे.’
हेही वाचा – IND vs AFG 2nd T20 : टीम इंडिया मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’! शिवम-जैस्वालने झळकावली वादळी अर्धशतकं
जोकोविचने खुलासा केला की भारतीय क्रिकेटचा दिग्गज विराट कोहलीबरोबर त्याचे खूप चांगले संबंध आहेत. तसेच काही वर्षांपासून तो त्याच्याशी सतत संवाद साधत आहे. नोव्हाक जोकोविचने कोहलीच्या चमकदार कारकिर्दीचे कौतुक केले आणि कोहलीचे आभार मानले. तो म्हणाला, ‘विराट कोहली आणि मी गेल्या काही वर्षांपासून मेसेजवर बोलत आहोत आणि आम्हाला कधीच प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली नाही, पण तो माझ्याबद्दल चांगले बोलतो आणि ऐकणे खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. मी स्पष्टपणे त्याच्या कारकिर्दीची आणि कर्तृत्वाची आणि त्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीची प्रशंसा करतो.’
हेही वाचा – VIDEO : विराटचे जोकोविचशी पहिल्यांदा कसे झाले होते संभाषण? स्वत: किंग कोहलीने सांगितला किस्सा
जोकोविच पुढे म्हणाला की, त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे आणि भारतात येण्यापूर्वी त्याचे क्रिकेट कौशल्य सुधारण्याची जबाबदारी विराटवर सोपवली आहे. जोकोविच म्हणाला, ‘मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. मला फारसे चांगले खेळता येत नाही, पण ऑस्ट्रेलिया आणि अर्थातच भारतात क्रिकेट हा एक जास्त प्रसिद्ध खेळ आहे. भारतात येण्यापूर्वी मला माझी कौशल्ये वाढवायला हवीत जेणेकरून मी तिथे राहिल्यावर मला लाज वाटू नये.’ जोकोविच नुकताच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथसोबत टेनिस खेळताना दिसला होता. त्याने टेनिस कोर्टवर क्रिकेटमध्येही हात आजमावला.