सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच याने चीन खुल्या टेनिस स्पर्धेत शंभर टक्के यशाचा प्रत्यय घडविताना चौथ्यांदा अजिंक्यपद प्राप्त केले. त्याने जागतिक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान घेणाऱ्या रॅफेल नदाल याच्यावर ६-३, ६-४ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळविला.
नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या लढतीत जोकोव्हिच याने चतुरस्र खेळाचा प्रत्यय घडविला. त्याने जेव्हा जेव्हा या स्पर्धेत भाग घेतला आहे, तेव्हा तेव्हा त्याने ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने नदालविरुद्धच्या अंतिम लढतीत फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा सुरेख खेळ केला, तसेच नेटजवळून त्याने प्लेसिंगचाही कल्पकतेने उपयोग केला. नदाल याने विजय मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्याला दोन्ही सेट्समध्ये प्रत्येकी एकदा सव्र्हिस गमवावी लागली.
नदाल याने यंदा फ्रेंच व अमेरिकन या दोन ग्रँड स्लॅम स्पर्धासह दहा स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविले आहे. हार्ड कोर्टवरील यंदाचा त्याचा हा पहिलाच पराभव आहे. हार्ड कोर्टवर त्याने यंदा २६ सामने जिंकले आहेत. त्याने येथील स्पर्धेत उपांत्य फेरीत टॉमस बर्डीचविरुद्धच्या विजयानंतर जागतिक क्रमवारीत अग्रस्थान घेतले. अंतिम लढतीत तो पराभूत झाला असला तरी त्याचे अव्वल स्थान राहणार आहे. जोकोव्हिच याने १०१ आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान राखले होते. नदाल याने विम्बल्डन स्पर्धेतील पहिल्या फेरीत पराभव स्वीकारला होता. त्यानंतर त्याने सलग २२ सामने जिंकले होते. त्याने कारकिर्दीत आतापर्यंत जोकोव्हिचविरुद्ध १६ सामने गमावले आहेत तर २२ सामने जिंकले आहेत.
जोकोव्हिचच्या खेळाचे कौतुक करीत नदाल म्हणाला, ‘‘जोकोव्हिच याने या स्पर्धेत अष्टपैलू खेळ केला आहे, त्यामुळेच विजेतेपदासाठी तो लायक आहे. त्याच्या वेगवान खेळापुढे मला अपेक्षेइतका खेळ करता आला नाही.’’
शांघाय खुल्या स्पर्धेत पुन्हा या दोन्ही खेळाडूंची गाठ पडण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत रॉजर फेडररही सहभागी होणार आहे. मात्र विम्बल्डन विजेता अँडी मरे याने पाठीच्या दुखण्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे.
‘‘नदाल याला अव्वल स्थान शोभून दिसते. त्याने यंदा अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याच्याविरुद्धच्या विजयामुळे मला खूप आनंद झाला आहे.’’
नोव्हाक जोकोव्हिच
जोकोव्हिच चौथ्यांदा अजिंक्य
सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिच याने चीन खुल्या टेनिस स्पर्धेत शंभर टक्के यशाचा प्रत्यय घडविताना चौथ्यांदा अजिंक्यपद प्राप्त केले
First published on: 07-10-2013 at 03:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic thumps rafael nadal in straight sets for fourth china open title