न्यायालयाला सुपूर्द कागदपत्रांत वकिलांचा दावा
एपी, मेलबर्न : सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचला गेल्या महिन्यात करोनाची बाधा झाली होती आणि त्यामुळेच त्याला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या लसीकरण नियमांतून वैद्यकीय सवलत मिळाल्याचा दावा त्याच्या वकिलांनी न्यायालयाला दिलेल्या कागदपत्रांत केला आहे.
जोकोव्हिचने १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळण्यासाठी बुधवारी मेलबर्न गाठले. मात्र, त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले. करोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. जोकोव्हिचने मात्र लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्याचे जाहीर केले होते.
मागील सहा आठवडय़ांत ज्या व्यक्तींना करोनाची बाधा होऊन गेली असेल, त्यांना लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळू शकते असा ऑस्ट्रेलियातील नियम सांगत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र लसीकरणाचे नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला. त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेले. त्याचा परत पाठवणीचा निर्णय न्यायालयाने सोमवापर्यंत प्रलंबित ठेवला आहे.
जोकोव्हिचच्या वकिलांनी न्यायालयात काही कागदपत्रे दाखल केली आहेत. ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ संघटनेने त्याला १ जानेवारीला लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्याचे प्रमाणपत्र दिले. काही दिवसांपूर्वीच करोनातून बरा झाल्याने ही सूट मिळाल्याचा त्यात उल्लेख असल्याचा दावा वकिलांनी केला आहे.
‘‘१६ डिसेंबर २०२१ रोजी जोकोव्हिचच्या करोना चाचणीचा अहवाल पहिल्यांदा सकारात्मक आला होता. मागील ७२ तासांत ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाहीत,’’ असे वैद्यकीय सवलतीच्या प्रमाणपत्रात म्हटले आहे.
जोकोव्हिचकडून चाहत्यांचे आभार
ऑस्ट्रेलियन प्रशासनाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करून त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये ठेवले. त्यानंतर त्याला जगभरातून असंख्य चाहत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत ‘इन्स्टाग्राम’च्या माध्यमातून सर्वाचे आभार मानले. ‘‘जगभरातून तुम्ही मला दर्शवत असलेल्या पाठिंब्याबद्दल खूप आभार. मला पाठबळ जाणवत असून त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.