Novak Djokovic share injury report : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून एक सेट खेळल्यानंतर माघार घेतली होती. तो जर्मनीच्या अलेक्झांडर झरेव्हविरुद्धचा सामना पूर्ण करू शकला नाही आणि दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. यानंतर काही लोकांनी त्याची खूप खिल्ली उडवली. त्याचबरोबर त्याची दुखापत गंभीर नसल्याचा दावा देखील केला होता. आता त्याने आपल्या एमआरआयचे रिपोर्ट शेअर करत, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोव्हाक जोकोव्हिचने त्याच्या दुखापतीच्या एमआरआयचे रिपोर्ट शेअर केले आहेत. त्याचबरोबर टीकाकारांना ‘दुखापती तज्ञ’ म्हणत त्यांची खरडपट्टी काढली आहे. नाव मागे घेतल्याने जोकोविचला आता २५ व्या ग्रँडस्लॅमसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या त्याच्याकडे १० ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदांसह २४ ग्रँडस्लॅम जेतेपदं आहेत.

नोव्हाक जोकोव्हिच काय म्हणाला?

नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी पहाटे सोशल मीडियावर त्याच्या हाताला झालेल्या दुखापतीचे एक्स रे पोस्ट केले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या सामन्यातून बाहेर पडल्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याने स्नायू फाटल्याचे सांगितले होते. आता २४ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियनने शनिवारी केलेल्या एमआरआयचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याने लिहिले की, ‘मी विचार केला की, हे सर्व रिपोर्ट क्रीडा दुखापती तज्ञांसाठी पोस्ट करावे.’ त्याने कोणतीही अतिरिक्त माहिती दिली नाही आणि तो कधी पुनरामन करेल हे सांगितले नाही.

जोकोव्हिचने सामन्यातून माघार घेतली –

वास्तविक, उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान जोकोविचने पहिला सेट गमावला होता. जर्मनीच्या दुसऱ्या मानांकित अलेक्झांडर झरेव्हने पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकला होता. यानंतर जोकोव्हिचने रेफ्रींना विचारून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रेक्षक आरडाओरडा करू लागले, मात्र जोकोव्हिचने आपला संयम न गमावता प्रेक्षकांसमोर टाळ्या वाजवल्या आणि थम्ब्स अप देऊन आभार मानले. नाव मागे घेतल्याने जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजयाचे शतक झळकावता आले नाही. या दिग्गज टेनिसपटूने उपांत्यपूर्व फेरीत कार्लोस अल्काराझचा पराभव करून ९९ वा विजय संपादन केला होता.

अलेक्झांडर झरेव्ह काय म्हणाला?

जोकोव्हिचची प्रेक्षकांनी खिल्ली उडवल्यानंतर झरेव्हही शांत राहू शकला नाही. तो म्हणाला की, जोकोव्हिचला दुखापत झाली होती, तरीही तो ७-६ अशा फरकाने जिंकू शकला. तो खरा आयकॉन आहे. झरेव्ह म्हणाला, ‘मला पहिली गोष्ट सांगायची आहे की कृपया कोणत्याही खेळाडूची खिल्ली उडवू नका. विशेषत: जेव्हा तो दुखापतग्रस्त असेल. मला माहित आहे की प्रत्येकाने तिकिटासाठी पैसे दिले आहेत आणि प्रत्येकाला पाच सेटचा एक चांगला सामना पाहायचा होता, परंतु तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. नोव्हाक जोकोव्हिच हा असा खेळाडू आहे, ज्याने गेल्या २० वर्षात खेळाला सर्व काही दिले आहे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Novak djokovic took dig at injury experts by sharing mri report retired from semifinal match in australian open 2025 vbm