मातीशी आपल्या सगळ्यांचं नातं अगदी घट्ट असतं. निसर्गाशी एकरूप होण्यात मातीचा वाटा मोलाचा असतो. जगभरातल्या टेनिसपटूंसाठी पॅरिसमधल्या रोलँड गॅरोसची माती अत्यंत जिव्हाळ्याची. ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिस विश्वाचे चार आधारस्तंभ. या चारपैकी एक आणि जिंकायला सगळ्यात कठीण अशी फ्रेंच खुली स्पर्धा रविवारपासून रंगणार आहे. स्पर्धेचे यंदाचे ११५वे वर्ष. लाल मातीने अनेकांना अस्मान दाखवलं आहे, मात्र तरीही शारीरिक आणि मानसिक कणखरतेची कसोटी पाहणाऱ्या लाल मातीवर जेतेपदाचा चषक उंचावणं प्रत्येक टेनिसपटूसाठी अभिमानास्पद गोष्ट असते. मातीवरल्या महासंग्रामाचा घेतलेला वेध..

जोकोव्हिचचं स्वप्न साकारणार?
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची ग्रँड स्लॅम जेतेपदांवरील मक्तेदारी मोडून काढत स्वत:चे स्थान निर्माण करण्याचे शिवधनुष्य नोव्हाक जोकोव्हिचनं पेललं. कलात्मक शैली आणि अफाट ताकद या दोन्ही आघाडय़ांवर फेडरर आणि नदालच्या तुलनेत पिछाडीवर असूनही जोकोव्हिचनं जपलेलं जिंकण्यातलं सातत्य अद्भुत आहे. चिवटपणे टक्कर देत प्रदीर्घ काळ खेळण्याची तयारी, प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास करून आखलेली रणनीती आणि मोक्याच्या क्षणी खेळ उंचावण्याची हातोटी यामुळे जोकोव्हिच यंत्रवत सातत्यानं जेतेपदांवर कब्जा करत आहे. यामुळेच कमी वेळात त्याच्या नावावर ११ ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. मात्र लाल मातीवरच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाने जोकोव्हिचला हुलकावणी दिली आहे. लाल मातीवर राफेल नदालला चीतपट करणं, हेच मोठं आव्हान असतं. अशक्य वाटणारं हे आव्हान जोकोव्हिचनं गेल्या वर्षी पार केलं. मात्र अंतिम लढतीत स्टॅनिसलॉस वॉवरिन्काच्या झंझावातापुढे तो निष्प्रभ ठरला.
जेतेपदाच्या इतक्या समीप येऊनही दूर राहावं लागल्याचं शल्य जोकोव्हिचनं अनेकदा व्यक्त केलं आहे. कारकीर्दीत ग्रँड स्लॅम जेतेपदांचं वर्तुळ पूर्ण करण्याची संधी जोकोव्हिचला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत नदालला सूर गवसला आहे आणि तो दुखातींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडला आहे. ही जोकोव्हिचसाठी चिंतेची बाब आहे. रॉजर फेडररला नमवण्याचं कौशल्य जोकोव्हिचनं कष्टपूर्वक आत्मसात केलं आहे. मात्र नदालला त्याच्या बालेकिल्ल्यात अर्थात लाल मातीवर हरवणं कठीण आहे. हे मातब्बर खेळाडू यंदा उपांत्य फेरीत समोरासमोर येण्याची शक्यता आहे. हा सामना प्रक्षेपण वाहिनीसाठी सर्वाधिक कमाई करून देणारा ठरेल यात शंकाच नाही. जिंकण्यातल्या सातत्याच्या बळावर जोकोव्हिच हळहूळू महानतेकडे वाटचाल करतो आहे. महानतेच्या मखरात विराजमान होण्यासाठी जोकोव्हिचला खेळाला सर्वसमावेशकतेचं कोंदण देणं अत्यावश्यक आहे.
नदाल जागा झाला आहे!
दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे राफेल नदालची अवस्था जखमी वाघासारखी झाली होती. मात्र विजिगीषु वृत्तीचं मूíतमंत प्रतीक असलेला नदाल आता जागा झाला आहे. आवडत्या आणि अविश्वसनीय प्रदर्शनाचा इतिहास असणाऱ्या लाल मातीवर वर्चस्व गाजवण्यासाठी तो सरसावला आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या स्पर्धामधील त्याची कामगिरी चाहत्यांसाठी आश्वासक आहे. मात्र प्रतिस्पध्र्याना नदालच्या कमकुवत झालेल्या शरीराची माहिती झाली आहे. त्याच्या मर्यादांवर आक्रमण करण्यासाठी प्रतिस्पर्धी उत्सुक आहेत. मात्र कोणत्याही स्थितीतून पुनरागमन करण्याची नदालची वृत्ती यंदा अनुभवायला मिळू शकते. रॉजर फेडररनं माघार घेतल्यामुळे नोव्हाक जोकोव्हिच हाच नदालसमोरचा जेतेपदातला मोठा अडसर आहे. मात्र त्याचवेळी अँडी मरे आणि गतविजेता स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांना कमी लेखणं धोकादायक ठरू शकतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेमुळे पुनरागमन करणं कठीण असतं. पण अपवादांना आपलंसं करणाऱ्या नदालनं लाल मातीवरच्या दहाव्या जेतेपदाला गवसणी घातल्यास त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरू शकते.
फेडरर नसल्याने बाकीच्यांना संधी
सलग ६५ ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळणं आणि त्यात बहुतांश वेळा किमान उपांत्य फेरी गाठणं अशा अचंबित करणाऱ्या गोष्टी रॉजर फेडररच्याच नावावर असू शकतात. गुडघ्यावर झालेली शस्त्रक्रिया आणि पाठीचं दुखणं यामुळे फेडररनं यंदा स्पर्धेतून माघार घेतली आहे. १९९९नंतर पहिल्यांदाच फेडरर ग्रँड स्लॅम स्पर्धेत दिसणार नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या फेडरर चाहत्यांसाठी ही बातमी निराश करणारी आहे. गेल्या तीन वर्षांत फेडररला ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावता आलेलं नाही. मात्र त्याच्या खेळाचा दर्जा आणि किमान उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणं, यामुळे फेडरर नेहमीच जेतेपदासाठी शर्यतीत असतो. यंदा लाल मातीवर फेडरर खेळणार नसल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी अँडी मरे, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का यांच्यासह दुसऱ्या फळीतील मंडळी आतूर आहेत. मोक्याच्या क्षणी कच खाण्याची वृत्ती सोडून दिल्यास मरे चमत्कार घडवू शकतो. काही दिवसांपूर्वीच झालेल्या माद्रिद स्पर्धेत जोकोव्हिचला नमवत मरेनं जेतेपद पटकावलं होतं. त्याची पुनरावृत्ती करायला मरेला आवडेल. ताकदवान खेळासाठी प्रसिद्ध वॉवरिन्कानं गेल्या वर्षी प्रस्थापित विजेत्यांची सद्दी मोडली होती. कौशल्याला, मेहनतीला सातत्याची जोड दिल्यास वॉवरिन्का यंदाही नाव कमावू शकतो. मारिन चिलीच, केई निशिकोरी आणि डेव्हिड फेरर यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.
‘सँटिना’ भरारी घेणार?
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांनी गेल्या वर्षभरात स्वप्नवत कामगिरी करताना जेतेपदांचा सपाटाच लावला. दहा विक्रमी जेतेपदांसह या जोडीनं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. सलग ४१ सामन्यांत अपराजित राहण्याचा विक्रम करणाऱ्या या जोडीनं यंदाही पाच जेतेपदांची कमाई केली आहे. लाल मातीवर हुकूमत गाजवण्यासाठी या दोघी सज्ज झाल्या आहेत. या दोघांव्यतिरिक्त रोहन बोपण्णा व चिरतरुण लिएण्डर पेस हे भारताचे शिलेदार स्पर्धेत आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहकारी निवडण्याची मुभा मिळण्यासाठी जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान टिकवणं बोपण्णासाठी अनिवार्य आहे. त्या दृष्टीने ही स्पर्धा बोपण्णासाठी निर्णायक आहे. दुसरीकडे रिओपूर्वी शस्त्रं परजून घेण्यासाठी पेस आतूर आहे.
सेरेनाच्या पर्यायाचा शोध
यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत अँजेलिक कर्बरच्या रूपात सेरेना विल्यम्सला पर्याय मिळाला. दुखापतींच्या फेऱ्यात अडकूनही सेरेनाच जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. महिला टेनिसला सातत्याचा शाप आहे. मानांकन मिळालेल्या टेनिसपटूच प्राथमिक फेरीतून गाशा गुंडाळतात. फॅशनेबल वस्त्रंप्रावरणं, साजेशा रंगाचे अलंकार यापेक्षा खेळाला महत्त्व दिल्यास चाहत्यांना सकस टेनिसची मेजवानी मिळू शकते. अन्यथा ‘सेरेना.. हरेना’ नारा नेहमीचाच!

 

पराग फाटक
parag.phatak@expressindia.com