जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेला नोव्हाक जोकोव्हिचला मियामी टेनिस स्पर्धेतील अंतिम लढतीत जपानच्या केई निशिकोरीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
गतविजेत्या जोकोव्हिचने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनवर ७-६ (७-५), ६-४ असा विजय मिळवला. जोकोव्हिचने आतापर्यंतच्या कारकीर्दीत अकरा वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळविली आहेत. त्याने येथे पाच वेळा अजिंक्यपद पटकाविले असून त्याला आंद्रे अगासीचा विक्रम खुणावत आहे. अगासीने मियामी स्पध्रेत सहा वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. या विक्रमाची बरोबरी करण्याची जोकोव्हिचला संधी आहे. सहाव्या मानांकित निशिकोरीने ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओसवर ६-३, ७-५ अशी मात केली. या स्पर्धेत प्रथमच त्याने अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. तो म्हणाला, ‘‘अंतिम फेरीतील प्रवेश ही माझ्यासाठी खूप समाधानाची कामगिरी आहे. अर्थात, माझ्यासमोर जोकोव्हिच असला तरी विजय मिळविण्यासाठी मी शर्थीचे प्रयत्न करणार आहे.’’

Story img Loader