टय़ुरिन : नोव्हाक जोकोविचने कामगिरीत सातत्य राखताना यानिक सिन्नेरला सरळ सेटमध्ये नमवत विक्रमी सातव्यांदा ‘एटीपी’ अंतिम टप्प्याच्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या जोकोविचने एक तास ४३ मिनिटे चाललेल्या सामन्यात स्थानिक खेळाडू सिन्नेरला ६-३, ६-३ अशा फरकाने पराभूत केले.
हेही वाचा >>> IND vs AUS: विश्वचषक जिंकण्यासाठी पॅट कमिन्सने आयपीएलचा करार मोडला होता, वर्षभरापूर्वीचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल
वर्षांच्या सुरुवातीला विक्रम रचणाऱ्या जोकोविचने वर्षांच्या अखेरीसही नवा विक्रम केला. त्याने २०२३च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे दहाव्यांदा जेतेपद पटकावले. यानंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेत २३वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवताना राफेल नदालचा विक्रम मोडीत काढला. जोकोविचला विम्बल्डनच्या अंतिम सामन्या कार्लोस अल्कराझकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर जोकोविचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. ‘‘हा हंगाम माझ्या कारकीर्दीतील सर्वश्रेष्ठ राहिला. या आठवडय़ात चांगल्या लयीत असलेला स्थानिक खेळाडू यानिक सिन्नेरविरुद्ध विजय मिळवणे ही चांगली गोष्टी राहिली,’’ असे जोकोविच म्हणाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोविचने चांगला खेळ करत सिन्नेरला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. ‘एटीपी’ अंतिम टप्प्याच्या सामन्यापूर्वी सर्वाधिक जेतेपो मिळवण्याचा विक्रम संयुक्तपणे जोकोविच व रॉजर फेडरर यांच्या नावे होता. यासोबतच १५ वर्षांत दुसऱ्यांदा कोणत्याही खेळाडूने चार ग्रँडस्लॅम व ‘एटीपी’ अंतिम टप्प्याच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी, अशीच कामगिरी जोकोविचने २०१५मध्ये केली होती.